मिरजेत काँग्रेसचा उमेदवार निवडीचेच आव्हान !
By Admin | Updated: June 9, 2014 00:57 IST2014-06-09T00:56:30+5:302014-06-09T00:57:12+5:30
मताधिक्यामुळे भाजपची आघाडी : मिरज ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार

मिरजेत काँग्रेसचा उमेदवार निवडीचेच आव्हान !
सदानंद औंधे ल्ल मिरज
मिरज विधानसभा मतदारसंघात काँगे्रस पक्षातर्फे इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मिरज विधानसभा मतदार संघात भाजपला सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याने भाजपला आव्हान देऊ शकेल, असा उमेदवार आताच जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेस नेते करीत आहेत.
मिरज शहर व तालुक्यातील सहकारी संस्था, सोसायट्या, ग्रामपंचायतीत काँगे्रसचे वर्चस्व आहे. काँग्रेसच्या तुलनेत भाजपची ताकद अल्प असली, तरी प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपने काँग्रेसवर मात केली आहे. मिरज शहरात अल्पसंख्यांक व दलित मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने येथे काँग्रेसची ताकद मोठी आहे. मिरज विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार निवडून येत असले, तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची मताधिक्याची परंपरा यावेळी प्रथमच खंडित झाली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत सरशी होण्यासाठी काँग्रेसला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.
काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात गतवेळी निवडणुकीपूर्वी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सुरेश खाडे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. गत विधानसभा निवडणुकीत मिरज पूर्व भागात राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे व त्यांच्या समर्थकांनी सुरेश खाडे यांना मदत केली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत झालेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत काँग्रेसने वर्चस्व राखले. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीत शहरात व ग्रामीण भागात भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी तब्बल ४६ हजारांची आघाडी घेऊन काँग्रेसचा बालेकिल्ला भुईसपाट केला. मिरज पूर्वभागात राष्ट्रवादीचे नेते अजितराव घोरपडे यांची साथ व नरेंद्र मोदी यांची मिरजेत झालेली प्रचारसभा यामुळे भाजपला मिरजेत मोठी आघाडी मिळाली.
येत्या चार महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पिछाडी भरुन काढणे हे काँगे्रससमोरील मोठे आव्हान आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आ. सुरेश खाडे यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र काँग्रेसचा उमेदवार निश्चित नसल्याने काँग्रेसच्या आघाडीवर सामसुम आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आनंदा डावरे, उद्योजक अॅड. सी. आर. सांगलीकर, प्रा. सिध्दार्थ जाधव, बाळासाहेब होनमोरे, दयाधन सोनवणे, जि. प. सदस्य प्रकाश कांबळे हे काँग्रेसतर्फे इच्छुक कार्यकर्ते आहेत. अजितराव घोरपडे समर्थक तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार, आम आदमी पक्षातर्फे संगीता दणाणे यांच्यासह अन्य इच्छुक उमेदवार असले, तरी भाजप विरुध्द काँग्रेस अशीच लढत रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे भाजप कार्यकर्त्यांत उत्साह आहे. राष्ट्रवादी नेत्यांच्या सोबतीने पुन्हा एकदा विधानसभेत विजय मिळविण्यासाठी आ. सुरेश खाडे यांची व्यूहरचना सुरू आहे.