इस्लामपुरात पालिका निवडणुकीसाठी पुनर्बांधणीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:16+5:302021-07-17T04:21:16+5:30

अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : नगरपालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकल्यानंतर विकास आघाडीतील नेत्यांत चार वर्षांतच बिघाडी झाली ...

The challenge of reconstruction for the municipal elections in Islampur | इस्लामपुरात पालिका निवडणुकीसाठी पुनर्बांधणीचे आव्हान

इस्लामपुरात पालिका निवडणुकीसाठी पुनर्बांधणीचे आव्हान

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : नगरपालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकल्यानंतर विकास आघाडीतील नेत्यांत चार वर्षांतच बिघाडी झाली आहे. त्यामुळे पुन्हा आघाडी करण्याचे आव्हान आहे. राष्ट्रवादीची बिघडलेली घडी बसविण्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यापुढेही आव्हान आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही गटात पुनर्बांधणी करण्याचे आव्हान नेत्यांपुढे राहणार आहे.

मागील निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि तत्कालीन राज्यमंत्री सदाभाऊ खोत एकत्र होते. दिवंगत नानासाहेब महाडिक आणि तत्कालीन आमदार शिवाजीराव नाईक यांची समझोता एक्सप्रेस एकाच रुळावर धावत होती. त्यातच निशिकांत पाटील राष्ट्रवादीतून विकास आघाडीच्या झेंड्याखाली आले. या सर्वांनी राष्ट्रवादीचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरणे बदलली. सदाभाऊ खोत आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात बेबनाव झाला. तेव्हापासून विकास आघाडीत बिघाडी झाली. ती आजही तशीच आहे. त्यानंतर खोत आणि महाडिक गट वाळवा-शिराळ्यात एकत्र आले. मात्र सध्या इस्लामपुरात भाजपच्या तीन नेत्यांचे तोंड तीन दिशांना आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांची भूमिका तळ्यात-मळ्यात आहे. विधानपरिषदेवर जाण्यासाठी ते राष्ट्रवादीशी सलगी करून आहेत. सदाभाऊ खोत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानतात, पण दुसरीकडे रयत संघटनेचा झेंडा फडकवत आहेत. महाडिक गटाचे राहुल महाडिक इस्लामपुरात राष्ट्रवादीविरोधी नेतृत्व उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर सम्राट महाडिक यांनी शिराळा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. या सर्वांना एकत्र आणण्याचे वरिष्ठ नेत्यांपुढे आव्हान आहे. विजयभाऊ पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमधील पोकळी भरून निघालेली नाही. त्यामुळे जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक यांच्याकडे शहरातील नेतृत्व जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीसाठी दोन्ही गटांची मोर्चेबांधणी करण्याचे आव्हान नेत्यांपुढे आहे.

चौकट

नवीन प्रभाग रचनेनंतर गती

पालिका सभागृहाची मुदत डिसेंबरमध्ये संपणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राहिला तर निवडणूक पुढे जाईल. निवडणूक पुढे गेल्यास पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती जाण्याची शक्यता आहे. ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान नवीन प्रभाग रचना केल्यानंतर पालिका निवडणुकीला गती येईल.

Web Title: The challenge of reconstruction for the municipal elections in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.