काँग्रेससमोर गटबाजीचे आव्हान

By Admin | Updated: September 24, 2015 23:52 IST2015-09-24T22:45:54+5:302015-09-24T23:52:30+5:30

संजयकाकांशी टक्कर : पलूस-कडेगाव मतदारसंघातील चित्र

Challenge of grouping against Congress | काँग्रेससमोर गटबाजीचे आव्हान

काँग्रेससमोर गटबाजीचे आव्हान

किरण सावंत - किर्लोस्करवाडी -विजयाचा षट्कार ठोकणाऱ्या डॉ. पतंगराव कदम यांच्यासमोर आता पलूस-कडेगावच्या विकासाबरोबरच पक्षातील गटबाजी मोडून काढण्याचे प्रमुख आव्हान आगामी वर्षात असणार आहे. गावागावात असणाऱ्या अंतर्गत गटबाजीला त्यांना तोंड द्यावे लागत आहे. डॉ. कदम यांनी पलूस-कडेगावचा विकास गेल्या १५ वर्षांत चांगल्याप्रकारे केला आहे, पण आगामी वर्षात सत्ता नसताना विरोधी बाकावर बसून विकासकामांची गती कायम ठेवण्याची जबाबदारी कदम यांच्यावर असणार आहे. डॉ. कदम यांनी या मतदारसंघात विकासकामांची गंगा आणली आहे, असे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात. सलग १५ वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्री म्हणून विकासकामांबरोबर शैक्षणिक, उद्योग, सामाजिक क्षेत्रात पलूस-कडेगाव मतदारसंघाचा कायापालट केला आहे. यापुढे मात्र विरोधी बाकावर असताना विकासाची गती कायम ठेवण्याची जबाबदारी डॉ. कदम यांच्याकडे आहे. यावेळी विकासकामांबरोबर पलूस तालुक्यातील गावागावात असणारी अंतर्गत गटबाजीही त्यांना थोपवावी लागणार आहे.
पलूस तालुक्यातून खासदारकीसाठी संजयकाका पाटील यांनीही चांगली मते घेतली होती. तालुक्यात भाजपची ताकद वाढलेली आहे. पृथ्वीराज देशमुख यांनाही आगामी काळात चांगले पद देऊ, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे.
संग्रामसिंह देशमुख यांनीही पलूस तालुक्याकडे आता विशेष लक्ष दिले आहे. भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामुळे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आदी पक्षांचा सामना करत असताना काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान आहे. क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद लाड यांनी राष्ट्रवादी पक्ष पुन्हा ताकदीने वाढविण्यास सुरुवात केली आहे. ही गटबाजी संपवण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी लागेल. अन्यथा पुढील काळात हीच गटबाजी डॉ. कदम यांना अडचणीची ठरू शकते. आगामी पलूस नगरपरिषदेत सत्ताकेंद्रे कशी एकवटतात; याकडे संपूर्ण लक्ष लागून राहिले आहे. पलूसमधील काँग्रेसअंतर्गत गट-तट, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्वांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
एकंदरीत सत्ता ताब्यात नसताना सत्तेबाहेर राहून विकासासाठी निधी आणणे, सूतगिरणी, शैक्षणिक व्याप सांभाळून दुसरीकडे अंतर्गत गटबाजी संपवून काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, डॉ. विश्वजित कदम, महेंद्र लाड, स्थानिक नेतेमंडळी यांची साथ बहुमोल ठरणार आहे.


जिरवाजिरवीची भाषा महागात पडणार
पलूस तालुक्यातील ३४ गावांपैकी काही गावात राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. काँग्रेससंदर्भात असणारी जिरवाजिरवीची भाषा मोडून काढण्यात डॉ. कदम कितपत यशस्वी होतात, यावरच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाची ताकद कळणार आहे. यामुळे आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Challenge of grouping against Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.