सभापती काँग्रेसचा, उपसभापती घोरपडेंचा!
By Admin | Updated: August 27, 2015 23:14 IST2015-08-27T23:14:03+5:302015-08-27T23:14:03+5:30
बाजार समिती : संतोष पाटील, जीवन पाटील यांची निवड

सभापती काँग्रेसचा, उपसभापती घोरपडेंचा!
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीवरून निर्माण झालेल्या वादात गुरुवारी अखेर जत तालुक्याने बाजी मारली. काँग्रेसचे संतोष पाटील यांची सभापतीपदी, तर भाजपमधील अजितराव घोरपडे गटाचे जीवन पाटील यांची उपसभापतीपदी गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला. बाजार समितीच्या निवडणुकीत पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालील रयत आघाडीने १९ पैकी १३ जागा जिंकल्या होत्या. व्यापारी गटातील दोन संचालकांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालकांची बैठक झाली.
या बैठकीत सभापती पदासाठी संतोष पाटील यांचा अर्ज दाखल झाला. त्यांच्या अर्जाला सूचक दीपक शिंदे, तर अनुमोदक रामगोंडा संती होते. उपसभापती पदासाठी अजितराव घोरपडे समर्थक जीवन पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाला सूचक अभिजित चव्हाण, तर अनुमोदक कुमार पाटील होते. दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी निकम यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
निवडीनंतर माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार दिनकर पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, विक्रम सावंत, जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने, शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पी. एम. पाटील यांनी नूतन सभापती, उपसभापतींचा सत्कार केला.
सत्कारावेळी घोरपडे म्हणाले की, बाजार समिती निवडणुकीत राजकीय ईर्षा होऊ नये, याची आम्ही दक्षता घेतली. गटा-तटाचा विचार न करता उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्याच्या विचाराने आम्ही एकत्र आलो. भविष्यात बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना अनेक सुविधा निर्माण केल्या जातील. शेतीमालावर प्रक्रिया व त्याची विक्री व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न आहे. सांगलीतील शेतीमालाला राज्य व जागतिक पातळीवर पोहोचवून चांगला दर मिळवून देण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जातील. (प्रतिनिधी)
मदन पाटील अनुपस्थित
सभापती, उपसभापती निवडीला माजी मंत्री व संचालक मदन पाटील गैरहजर होते. ते प्रकिया गटातून निवडून आले आहेत. पण त्यांना मतदानाचा अधिकार नाही. अशातच ते गैरहजर राहिल्याने निवडीवेळी त्याची चर्चा सुरू होती.
रयत आघाडीच्या नेत्यांनी बहुमताने सभापतीपदी निवड केली आहे. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बाजार समितीचा कारभार करू. कोणताही डाग लागणार नाही, याची दक्षता घेऊ. बाजार समितीचा कारभार पारदर्शी करण्यावर भर असेल.
- संतोष पाटील, सभापती
माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला पदाची संधी मिळाली आहे. वसंतदादांनी स्थापन केलेल्या या बाजार समितीची शान आम्ही कायम राखू. नेत्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. शेतकरी व शेतमालाचा विकास करण्यावर भर राहील.
- जीवन पाटील, उपसभापती