जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा सोमवारी होणार फैसला
By Admin | Updated: May 20, 2016 23:40 IST2016-05-20T23:17:51+5:302016-05-20T23:40:27+5:30
नेत्यांच्या केवळ बैठकाच : सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतरच बदल; राष्ट्रवादीतील नाराज गटावर लक्ष

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा सोमवारी होणार फैसला
सांगली : जिल्हा परिषद उपाध्यक्षासह चार सभापतींच्या निवडी होऊन पंधरा दिवस झाले तरीही अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत झालेले नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची तक्रार पोहोचल्यामुळे पुन्हा एकदा बदलाची चर्चा रंगली आहे. जिल्हाध्यक्षांनी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत सदस्यांची मते जाणून घेण्यासाठी सोमवार, दि. २३ रोजी सांगलीत पक्षाच्या कार्यालयात बैठक बोलाविली आहे. या बैठकीतच ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
जि. प.च्या उपाध्यक्ष आणि चार सभापती निवडीमध्ये भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या समर्थकांना डावलले आहे. यामुळे ते सदस्य सध्या नाराज आहेत. या सदस्यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवेळी विरोधात भूमिका घेण्याची घोषणा केली आहे. सदस्यांच्या या भूमिकेचा राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी अध्यक्ष बदलाबाबत सावध भूमिका घेतली आहे. शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी नेत्यांची बैठक झाली. पण, या बैठकीमध्ये सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतरच राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याचे ठरले आहे. सदस्यांची मते जाणून घेण्यासाठी दि. २३ रोजी राष्ट्रवादीच्या सांगलीतील कार्यालयात बैठक बोलाविली आहे. मते जाणून घेतल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय होणार आहे. (प्रतिनिधी)
हट्ट सोडा, समझोत्याने तोडगा काढा
अध्यक्ष पदाच्या स्पर्धेत तासगाव तालुक्यातून कल्पना सावंत, योजना शिंदे, स्नेहल पाटील इच्छुक आहेत. या तीन सदस्यांनी अध्यक्ष पदाचा आग्रह धरला आहे. निवडीनंतर दोन गट विरोधात जाण्याच्या भीतीमुळे नेते सावध भूमिका घेत आहेत. सदस्यांनी समझोत्याने तोडगा काढला असता, तर तीनही सदस्यांना पदे मिळाली असती, पण अध्यक्ष पदाच्या लाल दिव्याच्या वादामुळे सर्वच पदे गमाविण्याची वेळ आली आहे. आता संघर्ष थांबवला नाही, तर शेवटच्या सात महिन्यांसाठीही त्यांना अध्यक्षपद मिळण्याची शक्यता दिसत नाही.