सभापती, गटनेते ‘स्थायी’तून आऊट

By Admin | Updated: August 31, 2014 00:14 IST2014-08-31T00:09:40+5:302014-08-31T00:14:41+5:30

सांगली महापालिका : स्वाभिमानी आघाडीचे दोन्ही सदस्य बाहेर

Chairman, group leader 'Standing Out' | सभापती, गटनेते ‘स्थायी’तून आऊट

सभापती, गटनेते ‘स्थायी’तून आऊट

सांगली : महापालिका स्थायी समिती सभापती राजेश नाईक, गटनेते किशोर जामदार यांच्यासह आठ सदस्य आज (शनिवारी) स्थायी समितीमधून निवृत्त झाले. कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन, तर स्वाभिमानीच्या दोन सदस्यांचा यात समावेश आहे. राजेश नाईकही बाहेर पडल्याने आता सभापती व सदस्य निवडीचा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या स्थायी समितीमधून सोळापैकी आठ सदस्यांची आज सोडतीद्वारे निवृत्ती जाहीर झाली. महापालिकेतील सत्ता स्थापनेनंतर आठ सदस्यांना दोन वर्षाची, तर आठ सदस्यांना वर्षाकरिता संधी मिळत असते. ही संधी कोणाला किती काळ मिळणार, या गोष्टी सोडतीवर अवलंबून असतात. त्यामुळे शनिवारी स्थायी समितीची विशेष सभा आयोजित केली होती. आयुक्त अजिज कारचे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. सोडतीत सभापती राजेश नाईक, सत्ताधारी पक्षाचे गटनेते किशोर जामदार, वंदना कदम, धीरज सूर्यवंशी, उमेश पाटील, बाळासाहेब गोंधळी, मैनुद्दीन बागवान, शुभांगी देवमाने यांच्या निवृत्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
निवृत्त सदस्यांमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन, तर स्वाभिमानी आघाडीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे.
नव्याने त्यांच्याजागी नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांमध्येही पक्षनिहाय संख्याबळ तसेच ठेवण्यात येणार आहे. कुपवाडला प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून कुपवाडचे प्रशांत पाटील यांनी फिल्डिंग लावली आहे. स्थायी समितीमध्ये कॉँग्रेसचे नऊ, राष्ट्रवादीचे पाच आणि स्वाभिमानी आघाडीचे दोन सदस्य होते. आता राहिलेल्या समिती सदस्यांमध्ये कॉँग्रेसचे सहा, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे.
सभापती नाईक यांना विधानसभा निवडणूक संपेपर्यंत मुदतवाढ देण्याच्या हालचाली सुरू होत्या, मात्र त्यांचीच चिठ्ठी निघाल्याने आता त्यांच्या मुदतवाढीलाही ‘ब्रेक’ लागला आहे. नव्याने आठ सदस्य निवडताना आता सभापती पदाचीही निवड करावी लागणार आहे.
महिलांना सभापतीची संधी नाही
स्थायी समिती सभापतीपदासाठी प्रमुख दावेदारांमध्ये अनारकली कुरणे या महिला सदस्याही असल्या तरी आजवर महापालिकेच्या इतिहासात कधीही हे पद महिलेला मिळाले नाही. जर यावेळी हे पद त्यांना मिळाले तर त्या स्थायीच्या पहिल्याच महिला सभापती ठरू शकतात. (प्रतिनिधी)

Web Title: Chairman, group leader 'Standing Out'