वाळवा तालुक्यात वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:43+5:302021-07-04T04:18:43+5:30

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विराधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी विजयराव पाटील, ...

Central government protests against rising inflation in Valva taluka | वाळवा तालुक्यात वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारचा निषेध

वाळवा तालुक्यात वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारचा निषेध

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विराधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी विजयराव पाटील, शहाजी पाटील, दादासाहेब पाटील, संग्राम पाटील, पै. भगवान पाटील, अ‍ॅड. विश्वासराव पाटील, छाया पाटील, सुनीता देशमाने आदींची उपस्थिती होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल व गॅसची दरवाढ, तसेच वाढत्या महागाईच्या विरोधात वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने येथील तहसीलदार कार्यालयासमोर केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला. तातडीने पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल व गॅस दरवाढ मागे घेऊन देशातील जनतेला दिलासा द्यावा; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन देण्यात आले. तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस छाया पाटील, तालुका कार्याध्यक्षा सुनीता देशमाने यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

विजयराव पाटील म्हणाले, आपल्या राज्याने ज्याप्रमाणे भाजपाच्या १०५ आमदारांना बाजूला ठेवले, त्याप्रमाणे आता पेट्रोल १०६ च्यावर नेणाऱ्या भाजपा केंद्र सरकारला बाजूला करायला हवे. संग्राम पाटील म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांवर कौटुंबिक जबाबदारी नसल्याने ते असे वागत आहेत. त्यांनी सौभाग्यवतींना घरी आणावे, म्हणजे त्यांना कौटुंबिक जबाबदारी कळेल. छाया पाटील म्हणाल्या, देशातील महिला भगिनी गॅस दरवाढीने हैराण झाल्या आहेत. त्या तापते उलथने घेऊन मागे लागतील.

शहाजी पाटील, दादासाहेब पाटील, संजीव पाटील, कमल पाटील, मेघा पाटील, सुवर्णा जाधव, अलका माने, पुष्पलता खरात, युवती शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे, पदवीधर सेलचे प्रदेश सरचिटणीस विशाल सूर्यवंशी यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी बी.के. पाटील, एम.जी. पाटील, आनंदराव पाटील, अ‍ॅड. विश्वासराव पाटील, सुहास पाटील, भीमराव पाटील, दिलीपराव पाटील, आनंदराव पाटील, विठ्ठलराव पाटील, पै. भगवान पाटील, डॉ. प्रकाश पाटील उपस्थित होते.

Web Title: Central government protests against rising inflation in Valva taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.