केंद्राने साखर कारखान्यांना अनुदान द्यावे
By Admin | Updated: November 11, 2014 00:05 IST2014-11-10T21:54:38+5:302014-11-11T00:05:33+5:30
वैभव नायकवडी : हुतात्मा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ

केंद्राने साखर कारखान्यांना अनुदान द्यावे
वाळवा : यावर्षी साखरेचे दर गडगडल्याने ‘हुतात्मा’ला सुध्दा शासनाच्या एफआरपीप्रमाणे दर देणे अडचणीचे झाले आहे. त्यासाठी शासनाने अनुदानाचा निर्णय ताबडतोब घ्यावा. तसेच एफआरपीप्रमाणेच साखरेचे दरसुध्दा शाश्वतस्वरूपी अंतर्भूत करावेत, असे प्रतिपादन अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.
क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या ३२ व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी नायकवडी बोलत होते.
यावेळी माजी अध्यक्ष महादेव कांबळे, श्रीमती नीलावती माळी, उपाध्यक्षा सौ. वंदना माने, संचालिका सौ. सुनीता माळी उपस्थित होते.
नायकवडी म्हणाले की, सध्या साखरेचे दर प्रतिक्विंटल २६00 रुपये आहेत. बँका कारखान्यांना मार्केटमधील साखरेच्या दरावर ८५ टक्केच उचल देतात. त्यात कारखान्यांना तोडणी, ओढणी व कामगार पगार आणि इतर खर्च देऊनच शेतकऱ्यांना उसाचा दर द्यावा लागतो. सहकारमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी, केंद्रात व राज्यात त्यांचे सरकार असल्याने शेतकऱ्यांना चार पैसे जादा दर देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले आहे. त्याप्रमाणे याचा निर्णय लवकरात लवकर घेऊन साखर धंदा टिकण्यासाठी व शेतकऱ्यांना चार पैसे जादा दर मिळण्यासाठी प्रयत्न करून निर्णय घ्यावा. हा निर्णय तात्पुरता मलमपट्टीचा असू नये. कायमस्वरुपी जखम बरी होईल, असाच निर्णय असावा.
यावर्षी कारखाना मे २0१५ अखेर सुरू राहील. ७ लाख मेट्रिक टन गाळप व १३.५0 टक्के सरासरी रिकव्हरी घेण्याचे उद्दिष्ट व्यवस्थापनाने निश्चित केले आहे, असेही ते म्हणाले.
प्रारंभी कार्यकारी संचालक एन. एल. कापडणीस यांनी स्वागत केले. यावेळी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. काटा पूजन उपाध्यक्षा सौ. वंदना माने व माजी अध्यक्ष महादेव कांबळे यांनी केले. (वार्ताहर)