सांगली जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी
By Admin | Updated: February 19, 2015 23:37 IST2015-02-19T23:17:42+5:302015-02-19T23:37:06+5:30
यानिमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सांगली जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी
सांगली : सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विटा : ‘जय शिवाजी, जय भवानी’चा जयघोष करीत आज, गुरुवारी विटा शहरासह खानापूर तालुक्यात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
नगरपरिषदेने शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी पक्षप्रतोद वैभव पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, नगरसेवक दहावीर शितोळे, अविनाश चोथे, सलीम तांबोळी, सुधाकर शहा, एकनाथ गडदरे, सुरेश म्हेत्रे, बबन कांबळे, फिरोज तांबोळी उपस्थित होते. मनमंदिर यूथ फौंडेशनने बेंगलोर येथून आणलेला विशेष पुष्पहार अध्यक्ष सुमित गायकवाड यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अर्पण केला. जय शिवराय गु्रपने रायगड येथून शिवज्योत आणली होती. ज्योतीचे स्वागत ‘डायमंड’चे शंकर मोहिते, अमर शितोळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिवरायांच्या पुतळ्याची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. शिवदर्शन मंडळाने तीस फूट उंचीची किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती. प्रॅक्टिस ग्रुपच्यावतीने छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सभोवताली स्वच्छता व नित्यपूजा कार्यक्रम राबविण्यात आला. बुलंद मंडळाने शिवचरित्रावर व्याख्यान आयोजित केले असल्याचे अध्यक्ष उत्तम जाधव यांनी सांगितले. तसेच शार्प गु्रपच्यावतीने छत्रपती शिवरायांची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
इस्लामपूर : दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर गुरुवारी माजी मंत्री व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सूतगिरणीचे अध्यक्ष मारुती सखाराम जाधव यांच्याहस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी कार्यकारी संचालक अॅड. चिमण डांगे, चंद्रकांत पाटील, शांतिसागर कांबळे, हिंदुराव चव्हाण, उमेश गावडे, सरव्यवस्थापक व्ही. एस. देशमुख, लेखापाल आर. एस. मिरजे उपस्थित होते. बजरंग कदम, अशोक बडदे, गणेश पाटील, प्रशांत जाधव, एच. आर. पाटील, आर. वाय. लोंढे यांनी संयोजन केले.
कोकरुड : शिराळा येथील यशवंत युवक संघटनेच्यावतीने गुरुवारी शहरातील पोस्ट आॅफिसजवळील शिवपुतळ्यास औदुंबर येथील पुरोहितांच्या उपस्थितीत रणधीर नाईक यांच्या उपस्थितीत महाअभिषेक घातला. पाच नद्यांच्या पाण्याने पुतळ्यास जलाभिषेक करण्यात आला. यावेळी प्रल्हाद पाटील, सुखदेव पाटील, राजन पाटील, दिलीप कदम, उत्तम निकम, महेश पाटील, दीपक पवार, शहाजी पाटील, संग्राम पवार, सतीश पाटील, संजय घोडे, अॅड. नेहा सूर्यवंशी उपस्थित होत्या.
वाळवा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वाळव्यात उत्साहाने साजरी करण्यात आली. जय हनुमान मंडळ, अंबामाता मंडळ, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी, श्रमिकनगर येथील महात्मा फुले कल्चर ग्रुप यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जय हनुमान मंडळ, मराठा सेवा मंडळ यांच्यावतीने कार्यकर्त्यांनी गावातून रॅली काढली. (वार्ताहर)
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे झुंझार चौकातील मशिदीमध्ये शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लालासाहेब थोरात यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळयाचे पूजन करण्यात आले. शिवतेज युवा मंडळाच्यावतीने अमृतेश्वर देवालयात छत्रपतींच्या पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला व गावातील प्रमुख मार्गावरून झांजपथकाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. मशिदीमध्ये गणेश तरुण मंडळ, सॅक्रिफाईस, राजे व झुंझार ग्रुपच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी विनायक पाटील, अर्षद जमादार, रेहान मुलाणी, आश्पाक अत्तार उपस्थित होते. नो कॉम्प्रमाईज युवा ग्रुपने पन्हाळा येथून ज्योत आणली होती. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच रिहाना जमादार व उपसरपंच विजय पाटील यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचे पूजन करण्यात आले.