पालिकेच्या कानाकोपऱ्यात सीसीटीव्हीची नजर
By Admin | Updated: December 29, 2014 23:37 IST2014-12-29T22:37:33+5:302014-12-29T23:37:31+5:30
आयुक्तांचे नियंत्रण : मुख्यालयात नऊ नवे कॅमेरे येणार; सुरक्षेकरिता नव्या उपाययोजना

पालिकेच्या कानाकोपऱ्यात सीसीटीव्हीची नजर
सांगली : महापालिकेच्या कानाकोपऱ्यावर नजर ठेवण्यासाठी आता नव्याने नऊ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे काम सुरू झाले आहे. आयुक्तांच्या कार्यालयापासून मुख्यालय इमारतीच्या आवारातील पार्किंगपर्यंत सर्वत्र कॅमेऱ्यांचा ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेत सध्या सुरक्षा रक्षकही अनेक ठिकाणी तैनात आहेत. महापालिका बॉम्बने उडविण्याची धमकी वारंवार देण्यात येते. धमकीसत्र सुरू झाल्यानंतर प्रथमच महापालिकेने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात केली. महाआघाडीच्या कालावधित तर सर्वसामान्य माणसांनाही सुरक्षा रक्षकांनी मुख्यालयात जाण्यापासून मज्जाव केला होता. ठराविक कालावधी सोडला, तर नागरिकांनी महापालिका मुख्यालयात जाण्याची सोय नव्हती. नागरिकांच्या कामापेक्षा त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना अधिकारी, पदाधिकारी व नगरसेवकांची सुरक्षाच महत्त्वाची वाटली. त्यामुळे नागरिकांसाठी मुख्यालयाचे दरवाजे बंद झाले. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर दरवाजे पुन्हा खुले करण्यात आले, तरीही सुरक्षा रक्षकांचा गराडा कायम राहिला. सुरक्षेच्याबाबतीत महापालिका प्रशासन व याठिकाणचे पदाधिकारी अजूनही सतर्क आहेत. त्यामुळेच मुख्य प्रवेशद्वारावर दोन इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ दोन असे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
प्रशासनाने आता त्यापुढचे पाऊल टाकत महापालिकेच्या इमारतीचा कानाकोपरा सुरक्षेच्या कक्षेत घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी नव्याने नऊ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. कॅमेऱ्यातील प्रत्येक हालचालींवर आयुक्तांची नजर असणार आहे. त्यासाठी आयुक्तांच्या दालनातच नियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे. कोणत्याही ठिकाणच्या कक्षेत काय चालू आहे, या गोष्टी त्यांना दिसणार आहेत. (प्रतिनिधी)
कारभारावर वॉच कधी?
कॅमेऱ्याच्या माध्यमातून महापालिकेच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी, कारभारावर वॉच ठेवण्यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा महापालिकेत नाही. विशेष लेखापरीक्षणातील ताशेरे आणि वसुलीच्या यापूर्वीच्या प्रक्रियेनंतरही कारभारात सुधारणा होऊ शकली नाही. तिजोरीची सुरक्षा अजूनही ‘रामभरोसे’च आहे.
याठिकाणी
वॉच
इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या वऱ्हांड्यात, आयुक्त कार्यालयात, पहिल्या मजल्यावरील तसेच तळमजल्यावरील वऱ्हांड्यात, स्थायी समिती सभागृहात, महापालिका सभागृहात तसेच इमारतीच्या बाहेरील बाजूस कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यापूर्वी महापालिकेच्या बाहेरील बाजूस व आतील बाजूस काही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्या कॅमेऱ्यांपेक्षा चांगल्या दर्जाचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.