सीबीआयने गेल्या चार वर्षांतील प्रकरणांचीही चौकशी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:47+5:302021-04-06T04:25:47+5:30
सांगली : उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत सीबीआयकडून चौकशीचा निर्णय दिल्याने चौकशी होण्यासाठीच देशमुख यांनी राजीनामा दिला ...

सीबीआयने गेल्या चार वर्षांतील प्रकरणांचीही चौकशी करावी
सांगली : उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत सीबीआयकडून चौकशीचा निर्णय दिल्याने चौकशी होण्यासाठीच देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. सीबीआयनेही आता या प्रकरणाची योग्य ती निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, अशीच अपेक्षा आहे. सीबीआयने गेल्या चार वर्षांतील प्रकरणांचीही चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सोमवारी दिवसभरात घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
पाटील म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यानुसार सीबीआयकडून चौकशी झाल्यानंतर बरेच खुलासे समोर येणार आहेत. मात्र, सीबीआयनेही गेल्या चार वर्षांतील प्रकरणांची निष्पक्षपातीपणे चौकशी करणे अपेक्षित आहे.
देशमुख यांनी स्वत:हून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत माझ्याशी बोलणे झाल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही भेट घेऊन राजीनाम्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे सर्व लोक हे लोकशाहीची बूज राखणारे आहेत. त्यामुळे सीबीआय चौकशी पूर्ण होण्यासाठीच देशमुख यांनी राजीनामा दिला असून, यामुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर आली, असे अजिबात म्हणता येणार नसल्याचेही ते म्हणाले.
चौकट
वाझेचा तत्कालीन आयुक्तांशीच जास्त सहवास
अटकेत असलेला अधिकारी काय बोलतो, याबाबत सांगणे योग्य नाही. मात्र, त्याने मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेले वाहन, मनसुख हिरेनची हत्या याबाबत एनआयए तपास करत असून, माहितीवर आधारित शहानिशाही होईल. वाझे अलीकडेच सेवेत आलेला अधिकारी असल्याने सरकारशी सहवास नव्हता. याउलट मुंबईच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांशीच त्याचा जास्त सहवास असल्याचीही टिपणीही जयंत पाटील यांनी केली.