सीबीआयवर आता विश्वास राहिला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:55+5:302021-04-25T04:26:55+5:30
सांगली : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी न्यायालयाने सीबीआयला निर्देश दिले होते. त्यानुसार सीबीआय चौकशीतून ...

सीबीआयवर आता विश्वास राहिला नाही
सांगली : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी न्यायालयाने सीबीआयला निर्देश दिले होते. त्यानुसार सीबीआय चौकशीतून सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पंधरा दिवसांच्या तपासणीतून काय माहिती मिळाली हे न्यायालयास न सांगता सीबीआयने देशमुख यांच्या घरावर टाकलेले छापे निषेधार्ह आहेत. सार्वजनिक जीवनातील नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा डाव असून, आता सीबीआयवर आमचा विश्वास राहिलेला नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे पत्रकार बैठकीत व्यक्त केले.
पाटील म्हणाले की, पदावरून हटविले म्हणून एका अधिकाऱ्याने कोणताही पुरावा नसताना अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. या निर्णयाचा आदर राखत देशमुख यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सीबीआयकडून योग्य चौकशीची अपेक्षा होती. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या तपासणीतील निष्कर्ष न्यायालयाला सांगणे अपेक्षित होते. याबाबत कोणताही खुलासा न करता शनिवारी देशमुख यांच्या घरावर सीबीआयने टाकलेले छापे निषेधार्ह आहेत. छाप्यांबाबत आक्षेप नसला तरी यातून काय मिळाले याचीही माहिती त्यांनी द्यायला हवी. सीबीआयच्या एकूण कार्यपद्धतीवर आता विश्वास राहिलेला नाही.
सार्वजनिक जीवनातील नेत्यांची बदनामी करण्यासाठी छापे टाकायचे, त्याची बातमी करायची. मात्र, त्यात कोणतेही तथ्य आढळून येत नाही. सीबीआयच्या या कृतीचा निषेध असल्याचेही त्यांनी सांगितले.