‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग’असा मेसेज आल्यास सावधान; तुमची फसवणूक होऊ शकते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:43+5:302021-06-01T04:19:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, तातडीने लिंकवर जाऊन क्लिक करा अन्यथा तुमचे सीम ब्लाॅक होऊ ...

Caution if message ‘Seam Verification Pending’ arrives; You can be deceived! | ‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग’असा मेसेज आल्यास सावधान; तुमची फसवणूक होऊ शकते !

‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग’असा मेसेज आल्यास सावधान; तुमची फसवणूक होऊ शकते !

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, तातडीने लिंकवर जाऊन क्लिक करा अन्यथा तुमचे सीम ब्लाॅक होऊ शकते’, असे मेसेज सध्या वाढले आहेत. त्यातून अनेकांची हजारो रुपयांची फसवणूकही झाली आहे. अगदी सुशिक्षित तरुणही या ठकसेनांच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून येते. त्यामुळे असे मेसेज आल्यास सावध होऊन त्याला कसलीही माहिती देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे.

कोरोनाच्या काळात सध्या सर्वच व्यवहार थांबले आहेत. त्यात लाॅकडाऊनमुळे लोकही घरीच आहेत. अशा काळात फसवणूक करणाऱ्यांकडून मोबाईलवर मेसेजचा धुमाकुळ घातला जात आहे. ‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. आमच्या कस्टमर सेवेशी संपर्क साधा, नाहीतर तुमचे सीम २४ तासात ब्लाॅक होईल’, असे मेसेजेस् येत आहेत. आधीच लाॅकडाऊनमुळे मोबाईलमध्ये गुंतलेल्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सीमकार्ड बंद पडू नये, यासाठी अशा मेसेजला लोकही बळी पडत आहेत. ठकसेनांनी ऑनलाईन लुटीचा नवा फंडा सुरू केला आहे. अनेक मोबाईल ग्राहक कुठलीही खातरजमा न करता, ठकसेनाला सर्व माहिती पुरवतात. थोड्याच वेळात तुमच्या अकाऊंटवरून पैसे काढल्याचा मेसेज येतो. त्यानंतर फसवणूक झाल्याचे कळताच ग्राहक पोलिसांकडे धाव घेतो, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यामुळे अशा मेसेजला रिप्लाय न देणे हाच प्रथम आणि अंतिम उपाय आहे.

चौकट

असा काॅल अथवा मेसेज आल्यास सावधान

जिल्ह्यातील एका तरुणांला याच पद्धतीने गंडा घालण्यात आला आहे. हा तरुण इंजिनिअर आहे. सध्या त्याचे वर्क फाॅर्म होम सुरू आहे. त्याच्या मोबाईलवर सीम व्हेरिफिकेशनबाबत मेसेज आला. सीम बंद पडले या भीतीने त्यांनी ठकसेनेच्या सूचनेप्रमाणे सारी प्रक्रिया केली. काही मिनिटात त्याचे बँक खाते रिकामे झाले. त्यामुळे असा काॅल अथवा मेसेज आल्यास सावधान व्हा.

चौकट

ही घ्या काळजी

मोबाईलवर मेसेज अथवा काॅल आल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे हाच त्यावर उपाय आहे. फारच चिंता असेल तर संबंधित मोबाईल कंपनीच्या शहरातील डिलरकडे जाऊन त्याबाबत खातरजमा करावी. मगच अशा मेसेज अथवा काॅलला रिप्लाय द्यावा.

चौकट

कोणतेही ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी सावधान

सीम कार्ड ब्लाॅक होईल, अशी भीती दाखवून गुगल प्लेवरून ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. ॲप डाऊनलोड झाल्यानंतर त्याचे क्लोनिंग करून आपले बँक खात्याची माहिती घेतली जाते. मग बँकेतील पैसे ट्रान्सफर केले जातात. खात्यात पैसे कमी झाल्यानंतरच आपल्याला फसवणूक झाल्याचे कळते. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो.

चौकट

कोट

मोबाईलवरून काॅल अथवा मेसेज असो, संबंधित व्यक्तीला ग्राहकांनी ओटीपी, बँक खात्याची माहिती शेअर करू नये. कोणत्याही मोबाईल कंपन्याकडून अशी माहिती विचारली जात नाही. त्यातूनही फारच चिंता असेल तर संबंधित मोबाईल कंपनीच्या आऊटलेटमध्ये जावून खातरमजा करावी. - संजय क्षीरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सायबर विभाग, सांगली.

चौकट

१) मोबाईलवरून फसविल्याच्या तक्रारी

२०१९ - २६

२०२० - २२

२०२१ (मेपर्यंत)- १०

Web Title: Caution if message ‘Seam Verification Pending’ arrives; You can be deceived!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.