कोरोना संकटाने जत तालुक्यातील पशुपालक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:27 IST2021-04-20T04:27:22+5:302021-04-20T04:27:22+5:30
संख : कोरोना संचारबंदीने जत तालुक्यातील माडग्याळ, जत येथील जनावरांचा आठवडा बाजार बंद आहे. जनावरांची खरेदी-विक्री बंद असल्याने कोट्यवधी ...

कोरोना संकटाने जत तालुक्यातील पशुपालक अडचणीत
संख : कोरोना संचारबंदीने जत तालुक्यातील माडग्याळ, जत येथील जनावरांचा आठवडा बाजार बंद आहे. जनावरांची खरेदी-विक्री बंद असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली आहे. व्यापारी घरोघरी, शेतात जाऊन जनावरांची खरेदी करीत आहेत. परंतु अपेक्षित दर मिळत नाही. व्यापारी मागतील त्या दराने शेतकऱ्यांना जनावरे विकावी लागत आहे.
खिलार जनावरांसाठी व माडग्याळी जातीच्या मेंढ्यांसाठी तालुका प्रसिद्ध आहे. तालुक्यामध्ये एकूण जनावरांची संख्या ३ लाख ४९ हजार ८९५ इतकी आहे. त्यामध्ये गाय-बैल ७० हजार ९९६, म्हैशी ७० हजार ५८, शेळ्या ४५ हजार ९६४, मेंढ्या १ लाख ६२ हजार ८७७ इतकी संख्या आहे.
पूर्व भागातील माडग्याळ बाजार प्रसिद्ध आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बाजार बंद आहे. बाजाराला मुंबई, पुणे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा परराज्यातील व्यापारी हजेरी लावतात. पशुपालक कौटुंबिक अडचणीच्या वेळी जनावरे विकून अडचण भागवतात.
कोल्हापूर, सांगली येथील व्यापारी गावोगावी फिरून शेळ्या-मेंढ्या घेत आहेत. परंतु पशुपालकांना अपेक्षित असा दर मिळत नसल्याने, व्यापारी मागेल त्या दराने जनावरांची विक्री करावी लागत आहे.
यावर्षी अतिवृष्टी झाली. रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. ज्वारी पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे. चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने जनावरांची जोपासना कशी करायची, हा प्रश्न पशुपालकांसमोर आ वासून उभा राहिला आहे.
चाैकट
कर्नाटकातील वैरण बंद
कर्नाटकातील तिकोटा, बिजरगी, कनमडी, बाबानगर या परिसरामध्ये डोणची जमीन आहे. यावर्षी डोण परिसरात अतिवृष्टी झाली आहे. वैरण उत्पादन घटले आहे. त्यामुळे कर्नाटकातील येणारी वैरण बंद झाली आहे. माफक दरामध्ये वैरण मिळत असल्यामुळे पशुपालक येथून वैरणीची खरेदी करतात.
कोट
माडग्याळचा जनावरांचा आठवडा बाजार कोरोनाने बंद आहे. यामुळे कमी दराला अडचणीसाठी जनावरे विकावी लागत आहेत. बकरी ईदसाठी बोकड राखून ठेवले आहेत, पण दुसऱ्यावर्षीही या सणावर कोरोनाचे संकट उभे आहे. त्यामुळे पशुपालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
- तम्मा बिराजदार, पशुपालक.