जिल्ह्यात गाई-म्हैशीचे दर तीस टक्क्यांनी गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:02+5:302021-05-31T04:20:02+5:30
अतुल जाधव/ देवराष्ट्रे : कोरोनामुळे दुधाला मागणी कमी झाली आहे. त्यामुळे उत्पादक संकटात सापडले आहेत. जनावरे दावणीला ...

जिल्ह्यात गाई-म्हैशीचे दर तीस टक्क्यांनी गडगडले
अतुल जाधव/
देवराष्ट्रे : कोरोनामुळे दुधाला मागणी कमी झाली आहे. त्यामुळे उत्पादक संकटात सापडले आहेत. जनावरे दावणीला सांभाळणे अवघड होत आहे. याचा परिणाम गाई-म्हैशीच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे. बाजार बंद असल्याने गोठ्यातील जनावरांना खरेदीसाठी ग्राहक मिळत नसल्याने दर ३० ते ४० टक्क्यांनी गडगडले आहेत.
सलग दुसऱ्या वर्षी दूध व्यवसायाला कोरोनाचा जबर फटका बसला आहे. उत्पादनात मोठी घट झाली आहे. जनावरांचे बाजार बंद झाल्याने खरेदी-विक्री मंदावली आहे. मेहसाणा व दुगल जातीच्या म्हैशीचे दर लाखाच्या घरात, तर स्थानिक म्हैशीचे दर पन्नास ते सत्तर हजारांपर्यंत होते. पण सध्या ते ३० टक्क्यांनी घसरले आहेत. एरव्ही गाय ७० हजार ते ८० हजार रुपयांना खरेदी केली जाते. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांपासून २५ ते ३० हजारांपर्यंत दर खाली आले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून संकरित गायींच्या दूध दरात मोठी चढउतार होत आहे. दुधाला स्थिर दर राहील याची खात्री नाही. त्यामुळे जनावरे दावणीला सांभाळणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी जनावरे विक्रीचा पर्याय निवडत आहेत. मात्र, वाढती महागाई व दुधाचा कवडीमोल दर यामुळे जनावरांच्या किमती गडगडल्या आहेत. गाई कवडीमोल दराने विकल्या जात आहेत, तरीही खरेदी करणारा ग्राहक कमी आहे. गाय खरेदीकडे पशुपालकांनी पाठच फिरविली आहे.
कडेगाव, शिराळा, वाळवा, तासगाव, मिरज या परिसरात मोठ्या प्रमाणात गायीच्या पाड्यांचे संगोपन केले जाते. या परिसरातील अनेक कुटुंबे दूध व्यवसायावर अवलंबून आहेत. मंदीमुळे या कुटुंबांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
चौकट
जनावरांचे बाजार बंदचा फटका
सांगली जिल्ह्यात मिरजेचा जनावरांचा बाजार सर्वात मोठा असतो. त्यानंतर विटा व पलूसचा बाजार आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील शेतकरी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी वडगाव (कोल्हापूर), कऱ्हाड, सांगोला या मोठ्या बाजारात जातो. सध्या कोरोनामुळे सर्व बाजार बंद आहेत. त्याचा फटका बसत आहे.