गलाई व्यावसायिक ‘पर्ल्स’मुळे हवालदिल
By Admin | Updated: November 12, 2014 23:27 IST2014-11-12T22:23:07+5:302014-11-12T23:27:07+5:30
कोट्यवधींची गुंतवणूक : खानापूर तालुक्यात ७000 एजंट

गलाई व्यावसायिक ‘पर्ल्स’मुळे हवालदिल
दिलीप मोहिते : विटा ::अवघ्या ६ वर्षे ३ महिन्यांत रक्कम दामदुप्पट करून देण्यासह एजंटांना दुचाकी व चारचाकी गाडी देण्याचा दावा करणाऱ्या आणि सध्या वादात सापडलेल्या ‘पर्ल्स’ कंपनीत खानापूर तालुक्यातील परराज्यात स्थायिक झालेले सोने-चांदी व्यवसायातील गलाई बांधवांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र
पर्ल्स कंपनीबाबत उलटसुलट वृत्त येताच गलाई बांधव धास्तावले आहेत. तालुक्यात कंपनीचे सुमारे सात हजार एजंट कार्यरत असल्याचे वृत्त असून, आता या एजंटांच्या दारात अनेक गुंतवणूकदारांनी ठाण मांडले आहे.
२००३-०४ च्या सुमारास खानापूर तालुक्यात पर्ल्स कंपनीची एन्ट्री झाली. त्यानंतर एजंटांचा शोध घेत कंपनीच्या जुन्या एजंटांनी खानापूर तालुक्यात नवीन एजंटांचे जाळे विणले. तालुक्यात सोने-चांदी व्यवसाय मोठा असल्याने परराज्यात स्थायिक झालेल्या गलाई बांधवांना एजंटांनी लक्ष्य केले.
अनेक गलाई बांधवांनी गुंतवणूक केली. त्यातच एजंटांनाही सुरुवातीला मोठे कमिशन दिले जात असल्याने कालांतराने काही गलाई बांधवांनीही एजंटांची माळ स्वत:च्या गळ्यात अडकवून घेतली.
गलाई बांधवही एजंट झाल्याने कंपनीला सुवर्णनगरीत चांगले दिवस आले. आता कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे समजताच गुंतवणूकदारांनी थेट एजंटांना लक्ष्य करीत गुंतवलेले पैसे परत देण्याची मागणी सुरू केली आहे.
२०१२ ला करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार खानापूर तालुक्यात ३ हजार ५०० एजंट एकट्या पर्ल्स कंपनीचे काम करीत होते. त्यानंतर या एजंटांत वाढ झाल्यानंतर एजंटांचे संख्याबळ सुमारे सात हजारांपर्यंत पोहोचले. कंपनीत तालुक्यातील सुमारे ५५ ते ६० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचे समजते. त्यामुळे हे पैसे काढून घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी एजंटांचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एजंटही हवालदिल झाले आहेत.
सेवानिवृत्त होऊन गावी परतलेल्या माजी सैनिकांना गाठून कंपनीतील गुंतवणुकीचे फायदे पटवून देत त्यांना गुंतवणूक करण्यास एजंट भाग पाडत होते. काही शेतकऱ्यांनीही कमी कालावधित दामदुप्पट होत असल्याने उसाचे पैसे गुंतवल्याचे उजेडात आले आहे.