आरळ्याच्या बाजारामुळे काेकरुड-चांदाेली रस्त्यावर काेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST2021-02-24T04:28:28+5:302021-02-24T04:28:28+5:30
ओळ : आरळा (ता. शिराळा) येथे शनिवारी भरणारा आठवडा बाजार हळूहळू कोकरूड-चांदोली मुख्य रस्त्यावर येऊ लागल्याने वाहतूक कोंडी हाेत ...

आरळ्याच्या बाजारामुळे काेकरुड-चांदाेली रस्त्यावर काेंडी
ओळ : आरळा (ता. शिराळा) येथे शनिवारी भरणारा आठवडा बाजार हळूहळू कोकरूड-चांदोली मुख्य रस्त्यावर येऊ लागल्याने वाहतूक कोंडी हाेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : आरळा (ता. शिराळा) येथे मुख्य बाजारपेठेत भरणारा बाजार हळूहळू कोकरूड-चांदोली मुख्य रस्त्यावर येत आहे. छोटे-मोठे व्यापारी व बाजारकरूंची गर्दी आणि वडाप वाहनांची वर्दळ यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे.
शिराळा पश्चिम विभागातील आरळा ही प्रमुख बाजारपेठ आहे. शनिवारी येथे आठवडा बाजार भरतो. या बाजारपेठेत शिराळा तालुक्यातील मणदूर, खुंदलापूर, जाधववाडी, मिरूखेवाडी, सोनवडे, खोतवाडी, बेरडेवाडी, गुढे, पाचगणी, गुंडगेवाडी, करूंगली, मराठेवाडी, काळुंद्रे यासह वाड्यावस्त्यांवरील १५ गावांतील व शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर, उखळू, शिराळे वारूण, खेडे, उदगिरी, ढवळेवाडी, कदमवाडी यासह वाड्या-वस्त्यांवरील दहा गावांतील लोक बाजारहाट करण्यासाठी येतात.
त्यामुळे नेहमीच ही बाजारपेठ गर्दीने फुलून जाते. पूर्वी वडाच्या झाडापासून ग्रामपंचायत व घोडावली देवीच्या मंदिरापर्यंत बाजार भरत होता, पण स्थायिक व्यापाऱ्यांनी कोकरूड-चांदोली रस्त्यावर दुतर्फा दुकाने थाटली आणि भाजीपाला, कांदा बटाटे यासह छोटे-मोठे व्यापारी हळूहळू कोकरूड-चांदोली मुख्य रस्त्याशेजारीच पाल मारून व्यवसाय करू लागले. बाजारातील गर्दी आणि वडापच्या गाड्या यामुळे मुख्य रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
पूर्वी वडाच्या झाडापासून ते घोडावली देवीच्या मंदिरापर्यंत बाजार भरत होता. तसाच बाजार भरला तर कोकरूड ते चांदोली मुख्य रस्त्यावरील गर्दी कमी होऊन वाहतूक कोंडी होणार नाही. यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.