दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करावी

By Admin | Updated: November 27, 2014 23:52 IST2014-11-27T23:11:47+5:302014-11-27T23:52:55+5:30

जे. के. जाधव : रंगराजन समितीच्या शिफारशी स्वीकारणे हिताचे

Cancellation of two factory intermediary requirements | दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करावी

दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करावी

सांगली : साखर उद्योगासंदर्भात रंगराजन समितीच्या शिफारसी स्वीकारणे शेतकऱ्यांच्या हिताचे असून, राजकीय अस्थिरतेमुळे हा निर्णय लांबणीवर पडला आहे. प्रामुख्याने शासनाने दोन साखर कारखान्यांमधील अंतर ठेवण्याची अट तातडीने रद्द करावी, अशी मागणी मानसिंग बॅँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव यांनी आज (गुरुवारी) पत्रकार बैठकीत केली. आमणापूर परिसरात कृष्णाकाठ अ‍ॅग्रो प्रोसेस लि. या नावाने खांडसरी व कारखान्याचा परवाना मिळाला असून, लवकरच त्यास प्रारंभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
साखर उद्योग निर्बंधमुक्त करण्याबाबतच्या शिफारसी रंगराजन समितीने केंद्र सरकारकडे केल्या असल्याचे सांगून जे. के. (बापू) जाधव म्हणाले, सर्वच साखर उद्योजकांनी तसेच शेतकरी संघटनेच्या नेत्यांनीही या शिफारशींचे स्वागत केले आहे. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊन रंगराजन समितीच्या शिफारशी लागू करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यांनीही याबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला आहे. तशा आशयाचे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. महाराष्ट्र राज्य वगळून देशातील सर्व राज्यात रंगराजन समितीने केलेल्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या आहेत. तत्कालीन सरकारने दोन साखर कारखान्यांमध्ये ठराविक अंतर असावे, असे बंधन घातले आहे. परंतु या बंधनाची कोणतीच आवश्यकता नसल्याचे रंगराजन समितीने स्पष्ट म्हटले आहे. हा नियम घातक असून, विशिष्ट कारखान्यांसाठी उसाचे राखीव क्षेत्र निर्माण होण्यास यामुळे मदतच होणार आहे. दोन कारखान्यांमध्ये अंतराचे बंधन नसल्यास त्यांच्यात स्पर्धा होऊन गुणवत्तापूर्ण मालास चांगला दर मिळू शकेल. (प्रतिनिधी)

लवकरच कारखाना सुरु
कृष्णाकाठ अ‍ॅग्रो प्रोसेस खांडसरीच्या प्रकल्पास परवाना मिळाला असून, कारखाना काढण्यासही प्रशासनाची परवानगी मिळालेली आहे. पुढील गळीत हंगामात कारखाना सुरू करण्यात येणार आहे. अतिरिक्त खर्च टाळून कारखाना काढण्यात येणार असल्याने इतर कारखान्यांपेक्षा १०० ते १५० रुपये जादा भाव देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Cancellation of two factory intermediary requirements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.