सांगली : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा व दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने बुधवारी अपक्षांना निवडणूक चिन्ह वाटप केले. राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांना त्यांचे राखीव पक्षचिन्ह वापरण्याची मुभा मिळाली आहे. नामांकन भरल्यापासूनच पक्षीय उमेदवारांनी प्रचार सुरू केला असून आता अधिकृत प्रचारातही हे उमेदवार पुढे असतील. मात्र, अपक्षांकडे अवघे चार दिवसच उरले असून मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यासाठी त्यांना चांगली कसरत करावी लागणार आहे. विशेषतः, आपल्याच पक्षाची सत्ता येणार असल्याचा दावा करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांमध्येही शाब्दिक वॉर सुरू आहे.उरूण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत या सहा नगरपरिषदा आणि शिराळा, आटपाडी नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी ४१ उमेदवार तर १८१ नगरसेवक पदांसाठी एकूण ९३७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. बुधवारी अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप झाले. नामांकन करताना अपक्ष उमेदवारांनी १९४ मुक्त चिन्हांमधून तीन चिन्हे नमूद केली होती आणि प्रशासनाने त्यावर अंतिम मान्यता दिली आहे.
प्रचारासाठी चारच दिवसउमेदवारांना प्रचारासाठी २७ ते ३० डिसेंबरपर्यंत चार दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे प्रभागातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे हे मोठे आव्हान उमेदवारांसमवेत समर्थकांसमोर उभे आहे.
अपक्ष वाढविणार डोकेदुखीआठ पालिकांमध्ये भाजप स्वबळावर तर मित्रपक्षांसह महाविकास आघाडीतील पक्षांनी स्थानिक परिस्थितीनुसार आघाडी किंवा युती केली आहे; परंतु पक्षीय उमेदवारांसमोर अपक्षांचा आव्हान मात्र राहणार आहे. काही अपक्षांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त करतही उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे अपक्षांचा प्रचारातील जोर पक्षीय उमेदवारांच्या डोकेदुखीचा विषय ठरणार आहे.
नगरपालिकांवर आमचीच सत्ता, नेते करताहेत दावामहाविकास आघाडीची मुख्य ताकद उरूण-ईश्वरपूर, शिराळा, पलूसमध्ये बांधण्यात यशस्वी झाली आहे. आटपाडी, शिराळा आणि जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहे. विटा येथे भाजप-काँग्रेस गट एकत्र असून विरोधात शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येऊन निवडणुकीत उतरले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची कसोटी लागणार आहे. जिल्ह्यातील नेते व समर्थक आपल्याच पक्षांची नगरपालिकांमध्ये सत्ता येईल असा दावा करत आहेत.
मतदार विचारताहेत प्रश्न, सोशल मीडियावर व्हायरलनगरपालिका निवडणुकीसाठी नेते, उमेदवार आणि समर्थक डोअर टू डोअर जाऊन प्रचार करत आहेत. या दरम्यान मतदार आपल्या प्रभागातील रस्ते, वीज, पाणी यांसारख्या प्रश्नांसह इतर अनेक प्रश्न विचारून नेते व उमेदवारांची चौकशी करत आहेत. अशा प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
२ डिसेंबर रोजी मतदानआठ नगरपालिकांसाठी २ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होईल. मतमोजणीची प्रक्रिया दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ३ डिसेंबर रोजी पार पडेल.