टप्प्यात आला अन् ‘कार्यक्रम’ केला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST2021-02-24T04:28:08+5:302021-02-24T04:28:08+5:30
श्रीनिवास नागे अडीच महिन्यांपूर्वी ‘पदवीधर’चा निकाल लागल्यानंतर सांगली शहरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांची पोस्टर्स लागली होती. ...

टप्प्यात आला अन् ‘कार्यक्रम’ केला!
श्रीनिवास नागे
अडीच महिन्यांपूर्वी ‘पदवीधर’चा निकाल लागल्यानंतर सांगली शहरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांची पोस्टर्स लागली होती. त्यांच्या हसऱ्या छबीसोबत स्लोगन होती, ‘टप्प्यात आला की, आम्ही कार्यक्रम करतोच!’ तेव्हाच त्यांचा इरादा समोर आला होता. तशी जोरदार चर्चा अख्ख्या जिल्ह्यात सुरू झाली होती. जयंतरावांना विचारल्यावर म्हणाले होते, ‘महापालिकेत ज्यांना लोकांनी बहुमत दिलंय, त्यांनी कार्यकाल पूर्ण करावा.’ त्यातला गर्भितार्थ भाजपला समजलाच नाही. त्यांनी हलक्यात घेतलं अन् मंगळवारी ‘करेक्ट कार्यक्रम’ झाला. कोरोनामुळं तयार झालेलं ऑनलाईन मतदान पद्धतीतलं संशयाचं धुकं गडद करत जयंतरावांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बंदुकीतून डबलबार टाकला... अन् महापालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीचा महापौर करून दाखवला!
अडीच वर्षांपूर्वी राज्यातल्या सत्तेच्या जोरावर भाजपनं फोडाफोडी केली होती. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी मेगाभरती करत काँग्रेस-राष्ट्रवादीचे शिलेदार पळवले. सत्ता आणली. आज तोच डाव चलाख जयंतरावांनी उलटवला. राज्यातल्या सत्तेच्या बळावर भाजपवरचा निशाणा साधला. काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील यांना सोबत घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टिपलं. गेल्या चार महिन्यांपासून चंद्रकांतदादांनी जयंतरावांना डिवचलं होतं. गोपीचंद पडळकर वगळता सांगलीतले खासदार-आमदार जयंतरावांविरुद्ध ‘ब्र’ही काढत नव्हते, पण चंद्रकांतदादांनी टीकेचा ठेका कायम ठेवला होता. तो वचपा काढायचाच होता.
महापलिकेच्या साठमारीत दोनदा घायाळ झालेले जयंतराव सावज टप्प्यात येण्याची वाट पाहत होते. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघावर अचूक निशाणा साधल्यावर आघाडीला हत्तीचं बळ मिळालं. त्यानंतर जयंतरावांचं टार्गेट महापालिकाच होतं. काठावरच्या बहुमतात असलेल्या भाजपकडं सहयोगी सदस्यांसह ४३ नगरसेवक होते. त्यांना सत्तेतून खेचायचं असेल तर ३५ नगरसेवक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी पाच मतांची गरज होती. चंद्रकांतदादांनी भरती केलेल्यांमधील वीस जण पूर्वाश्रमीला आघाडीतच होते. त्यातच भाजपच्या कारभाऱ्यांमुळं सत्ताधाऱ्यांतील नाराजी वाढली होती. खासदारांसोबत काही गट खार खाऊन होते. बावीस जण खप्पा मर्जी झालेले. त्यातली फुटू शकणारी मंडळी जयंतरावांच्या गटानं हेरली. भाजपनं महापौर पदासाठी कुणालाही उमेदवारी दिली असती तरी ती फुटणारच होती. नावं जाहीर झाली अन् बारा जण ‘नॉट रिचेबल’ झाले. भाजपनं पाच जणांना परत वळवलं, पण नऊ जण सापडले नाहीत. त्यातले दोघं कोरोना बाधित झाले. जयंतराव स्वत:ही कोरोनाग्रस्त झाले, पण मुंबईतल्या बंगल्यात बसून त्यांनी सूत्रं हलवली. उरलेल्या सात जणांना उचललं. खोपोलीला नेऊन ठेवलं. कुणालाच पत्ता नाही लागला!
मिरजेतले माजी महापाैर मैनुद्दीन बागवान यांना परत महापौर करायचा मनसुबा होता, पण राष्ट्रवादीच्या सांगलीतल्या कारभाऱ्यांना अन् मिरजेतल्या नायकवडी गटाला बागवान नको होते. जयंतरावांनी एकीकडं बागवानांचं कार्ड पुढं करत दुसरीकडं आस्ते कदम दिग्विजय सूर्यवंशींचं नाव पुढं आणलं. काँग्रेसमधल्या झाडून सगळ्या गटांना सोबतीला घेतलं. जुळणी लावली. विशाल पाटील गटाला उपमहापौरपद, जयश्रीवहिनींच्या गटाला गटनेतेपद, तर कदम गटाला स्थायी समिती देण्याचं ठरलं. ऑनलाईन मतदान पद्धतीतल्या पळवाटा शोधल्या. नंतर सावध असलेल्या या सगळ्या नेत्यांनी ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरेना’, अशी हूल उठवली. भाजपनं पुन्हा हलक्यात घेतलं अन् ‘करेक्ट कार्यक्रम’ झाला!