कणदूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:24 IST2021-03-15T04:24:43+5:302021-03-15T04:24:43+5:30
पुनवत : कणदूर (ता. शिराळा) येथे तांबूळ नावाच्या शेतात संपत सदाशिव पाटील यांच्या जनावरांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला केला. ...

कणदूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
पुनवत : कणदूर (ता. शिराळा) येथे तांबूळ नावाच्या शेतात संपत सदाशिव पाटील यांच्या जनावरांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला केला. यात एक वासरू ठार झाले. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कणदूर येथून नदीकडे जाणाऱ्या पाणंदीला तांबूळ नावाच्या शेतात संपत सदाशिव पाटील यांची जनावरांची वस्ती आहे. वस्तीत लहानमोठी सात जनावरे आहेत. शनिवारी मध्यरात्री बिबट्याने या वस्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात एक वासरू ठार झाले. बिबट्याने वासराला मक्याच्या शेतात ओढून नेवून त्याचा फडशा पाडला. मक्याच्या शेतात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत.
घटनास्थळी वनरक्षक प्रकाश पाटील, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी अविनाश कदम, मारुती पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला.
यावेळी वनरक्षक प्रकाश पाटील यांनी बिबट्याच्या हल्ल्याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले. यावेळी दिलीप पाटील, उपसरपंच आनंदराव पाटील, संजय पाटील, शीतलकुमार कुराडे, सदाशिव पाटील, मच्छिंद्र पाटील, पोपट पाटील, नानासाहेब पाटील, पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते .
चौकट
शेतीला दिवसा वीज द्या
बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतकऱ्यांना रात्री शेताला पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीविताला धोका आहे. यामुळे महावितरणने शेतीपंपासाठी रात्रीऐवजी दिवसा वीज देण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.