दूध व्यवसाय ठरतोय आतबट्ट्याचा

By Admin | Updated: April 2, 2015 00:46 IST2015-04-01T23:01:28+5:302015-04-02T00:46:38+5:30

शेतकऱ्यांची कोंडी : वैरण, पशुखाद्याच्या दरात भरमसाट वाढ

The business of milk is under-going | दूध व्यवसाय ठरतोय आतबट्ट्याचा

दूध व्यवसाय ठरतोय आतबट्ट्याचा

सुनील जाधव - सागाव -दुभत्या जनावरांच्या गगनाला भिडलेल्या किमती, वैरणटंचाई आणि पशुखाद्याची दरवाढ यामुळे दूध व्यवसाय आतबट्ट्याचा ठरू लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी, दूध व्यवसायासारख्या जोडधंद्याने शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला हातभार लावला आहे. त्यामुळे अगदी भूमिहीन शेतकऱ्यांच्या गोठ्यातही दोन-तीन म्हैशी दिसतात. दूध संस्था दर दहा दिवसाला बिले देत असल्याने शेतकऱ्यांना सोयीचे ठरते. चार-पाच वर्षांपूर्वी दुभत्या म्हैशीची किंमत अठरा ते वीस हजारांपर्यंत, तर गाईची किंमत बारा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत होती. त्यामुळे दुभती जनावरे सर्वांच्या आवाक्यात होती, मात्र गेल्या दोन वर्षात दुभत्या जनावरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मध्यम म्हैशीची किंमत तीस हजारांपर्यंत, तर चांगल्या म्हैशीची किंमत चाळीस ते पन्नास हजारादरम्यान आहे. गाईची किंमत पंचवीस ते पस्तीस हजारांपर्यंत आहे. दूध संस्था अथवा पतसंस्थेतून कर्जाने पैसे घेऊन महागडी जनावरे घेणे परवडत नाही.
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आल्याने हिरव्या वैरणीची टंचाई निर्माण झाली आहे. सुके गवत तर गगनाला भिडले आहे. गवताचा दर एक हजार पेंड्यांना दीड हजार रुपयांवर, तर पिंजराचा भारा शंभर रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर दरदेखील हजार रुपयांच्या पटीत आहेत. त्यातच भाकड जनावरांच्या समस्येने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. निघणारे उत्पन्न व होणारा खर्च यांचा ताळमेळच बसत नाही. जे दूध शेतकऱ्यांकडून ३० ते ३५ रुपयांना प्रतिलिटर विकत घेतले जाते, तेच दूध संस्था, संघांना व गिऱ्हाईकांना ३८ ते ४२ रुपयाने विकतात. याचा फायदा संस्थांच्याच पदरात पडतो आहे. विविध मार्गाने हा दूध व्यवसाय शेतकऱ्यांना अडचणीचा ठरत असून, शेतकऱ्यांच्या पदरात फक्त शेणखतच मिळत आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. दूध उत्पादकांच्या पदरात उत्पादन खर्च तरी पडला पाहिजे.

Web Title: The business of milk is under-going

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.