मिरजेतून कर्नाटकातील बस सेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST2021-03-14T04:25:10+5:302021-03-14T04:25:10+5:30
बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या गाडीवर हल्ला चढवल्याने दोन्ही राज्यात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर ...

मिरजेतून कर्नाटकातील बस सेवा बंद
बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या गाडीवर हल्ला चढवल्याने दोन्ही राज्यात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर कोल्हापूर एसटी स्थानकात दगडफेक करुन एका एसटीच्या काचा फोडण्यात आल्या. यामुळे शिवसैनिकांनी कोल्हापूर बसस्थानकात कर्नाटक राज्याची बससेवा बंद केली. या पार्श्वभूमीवर मिरजेत येणाऱ्या कर्नाटक एसटीच्या फेऱ्या बंद झाल्या आहेत. मिरज आगाराच्याही कर्नाटकात जाणाऱ्या एसटी फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. मिरजेत कर्नाटकातून दररोज सुमारे अडीचशे बसेस येतात. मिरज आगारातून दररोज जमखंडीला चार फेऱ्या आहेत. मिरज शिवाय जिल्ह्यातील इतर आगाराच्याही कर्नाटकात जाणाऱ्या सुमारे २० फेऱ्या बंद होत्या. कर्नाटक एसटी बंद झाल्याने मिरज बसस्थानकात गर्दी कमी असल्याचे चित्र होते. पुढील आदेशापर्यंत कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसेस बंद ठेवण्याचे आदेश असल्याचे मिरज आगारातील वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. मिरजेत येणाऱ्या कर्नाटक बसेस बंद असल्याने वडाप व खासगी वाहनातून कागवाड सीमेपर्यंत प्रवासी वाहतूक सुरू होती.