रेणावीजवळ बस नाल्यात कोसळली
By Admin | Updated: March 1, 2015 00:13 IST2015-03-01T00:08:41+5:302015-03-01T00:13:12+5:30
१४ प्रवासी जखमी : कमानपट्ट्या तुटून अपघात, बसचालकावर गुन्हा दाखल

रेणावीजवळ बस नाल्यात कोसळली
विटा : कमानपट्ट्या तुटून टायर फुटल्याने बस सुमारे दहा फूट खोल नाल्यात कोसळून १४ प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज (शनिवारी) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास रेणावी (ता. खानापूर) गावाजवळ घडला. जखमीत तीन महिलांसह दहा पुरुष व एका लहान मुलाचा समावेश आहे. कनार्टकातील विजापूर जिल्ह्यातील सहा, सातारा जिल्ह्यातील पाच व सांगली जिल्ह्यातील तीन प्रवाशांचा समावेश आहे.
कर्नाटकची इंडीहून साताऱ्याकडे जाणारी बस (क्र. केए २८, १६७१) रेणावीजवळ आली असता, उतरतीला तीव्र वळणास बसच्या पुढील चाकाजवळच्या कमानपट्ट्या अचानक तुटल्या. त्यावेळी चालकाच्या बाजूचे पुढील टायरही फुटल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस उजव्या बाजूला झुडपे तोडून सुमारे दहा फूट खड्ड्यात कोसळली.
या अपघातात बसमधील १४ प्रवासी जखमी झाले. विटा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसचालक अमोघसिद भीमाण्णा अपधी (५०, रा. विजापूर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
गंभीर जखमींवर सांगलीत उपचार
विजापूर जिल्ह्यातील आप्पासाहेब शिवाप्पा खरात (५५, रा. डोमनार), दीपक रामान्ना वडर (३०), रामन्ना वडार (३०, दोघेही रा. देवहिपरगी), कमलाप्पा बाबू मानवत (रा. विजापूर), कृष्णा हणमंता वडर (रा. नाद), हणमंत बाबू मानवत (२९, रा. विजापूर), सातारा जिल्ह्यातील महाबुबीन रज्जाक फराटे (१८), मैनुरब्बी फराटे (३५), सोहेब रज्जाक फराटे (५), रज्जाक लालसाब फराटे (४०), आयेशा रज्जाक फराटे (१२, सर्व रा. वाठार, ता. कऱ्हाड), तसेच सांगली जिल्ह्यातील परशाप्पा यल्लाप्पा व्हनमराठे (५०, रा. संख, ता. जत), सुनील लालसिंग राठोड (२३, रा. दरीबडची, ता. जत) व प्रवीण बंडू राजमाने (२०, रा. घानवड, ता. खानापूर) असे १४ प्रवासी जखमी झाले. यापैकी आप्पासाहेब खरात, सुनील राठोड, कमलाप्पा मानवत, महाबुबीन फराटे व प्रवीण राजमाने यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(वार्ताहर)