चौदा एकर ऊस जळाला

By Admin | Updated: February 18, 2015 01:17 IST2015-02-18T01:17:23+5:302015-02-18T01:17:23+5:30

आमणापुरातील घटना : पाच लाख रुपयांचे नुकसान

Burn fourteen acres of sugarcane | चौदा एकर ऊस जळाला

चौदा एकर ऊस जळाला

 भिलवडी : आमणापूर (ता. पलूस) येथील शेरी भाग परिसरातील पाटील परिवाराच्या मालकीच्या चौदा एकर क्षेत्रामधील ऊस मंगळवारी मध्यरात्री अज्ञाताने पेटविला. ऊसतोडणीसाठी आलेला ऊस अचानक जळाल्याने अंदाजे चार लाखाचे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे.
ही घटना मंगळवार, दिनांक १७ रोजी मध्यरात्री बारा ते दोनच्यादरम्यान घडली. याबाबत माहिती अशी की, आमणापूर-धनगाव रस्त्यादरम्यान शेरी भाग वस्ती परिसरालगत मधल्या मार्गाच्या पलूस रस्त्यालगत पाटील परिवाराच्या शेतातील उसाला रात्री बारा वाजण्याच्यादरम्यान आग लागली. एक वाजण्याच्या सुमारास काही शेतकऱ्यांनी उसाला आग लागल्याचे पाहिले. आरडाओरडा करून त्यांनी लोकांना जागे केले व थेट शेताकडे धाव घेतली. पण वाऱ्यामुळे आग इतकी फोफावली की, ती विझविण्याचा कोणताही प्रयत्न शेतकऱ्यांना करता आला नाही. यामध्ये ज्ञानदेव महादेव पाटील व सुरेखा ज्ञानदेव पाटील यांच्या मालकीचा साडेचार एकर, सौ. बालिका आकाराम पाटील व गायत्री आकाराम पाटील यांच्या मालकीचा साडेचार एकर, सुरेश राजाराम पाटील व सौ. ताराबाई राजाराम पाटील यांचा साडेचार एकर, शंकर जगन्नाथ सूर्यवंशी यांचा अर्धा एकर ऊस या आगीत जळाला. तसेच बाजूला असणाऱ्या जगन्नाथ निवृत्ती पाटील यांच्या आडसाली ऊस लागणीचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पलूस तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आर. एम. पााटील, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपटराव फडतरे, एन. एस. पाटील तसेच अधिकारी वर्गाने समक्ष भेट देऊन पाहणी केली. या जळीत उसाची क्रांती सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ऊसतोडणी सुरू आहे.
जळीत उसाची तोडणी करताना प्रतिटन किमान ३०० रुपये अशी तूट आकारली जाते. यामुळे किमान तीन ते चार लाखांवर शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलिसांमध्ये संबंधित शेतकऱ्यांनी अद्यापही पोलीस ठाण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही. (वार्ताहर)

Web Title: Burn fourteen acres of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.