डोर्लीत दीड लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST2021-01-20T04:27:02+5:302021-01-20T04:27:02+5:30
जत : डोर्ली (ता. जत) येथे दिवसाढवळ्या घरफोडी करत चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्यासह एक लाख ५० हजार रुपयांचा ...

डोर्लीत दीड लाखांची घरफोडी
जत : डोर्ली (ता. जत) येथे दिवसाढवळ्या घरफोडी करत चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्यासह एक लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
डोर्ली येथील उमेश किसन माने (वय २५) यांची डोर्ली ते हिवरे रस्त्यावर डोर्लीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील मानेवाडी येथे शेतजमीन व घर आहे. येथेच ते पत्नीसोबत रहतात. मंगळवारी दुपारी ते घराला कुलूप लावून शेतात गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाची कडी कोंयडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील रोख ७० हजार रुपये व गंठण, अंगठी, बदाम आदी १५ ग्राम सोन्याचे दागिने असा सुमारे एकूण एक लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
उमेश माने हे घरी पाणी पिण्यासाठी आल्यानंतर चोरीची घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते मुकेश पवार यांना माहिती दिली. त्यांनी यासंदर्भात जत पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस हवालदार सचिन हाक्के करत आहेत.