शिराळ्यातील माेबाइल दुकानातील चाेरीचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:33+5:302021-02-09T04:29:33+5:30
शिराळा : येथील सोमवार पेठतील शिवशक्ती मोबाइल शॉपीचे कुलूप तोडून दोन लाख रुपये किमतीचे मोबाइल चोरीप्रकरणी संशयित ...

शिराळ्यातील माेबाइल दुकानातील चाेरीचा छडा
शिराळा : येथील सोमवार पेठतील शिवशक्ती मोबाइल शॉपीचे कुलूप तोडून दोन लाख रुपये किमतीचे मोबाइल चोरीप्रकरणी संशयित प्रकाश नंदू भालेकर (वय २८, रा. निगडी, ता. शिराळा) यास शिराळा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ७४ हजार ४७५ रुपये किमतीचे मोबाइल व ४० हजार रुपये किमतीची दुचाकी. असा २ लाख १४ हजार ४०५ रुपये किमतीचा मु्द्देमाल जप्त केला आहे.
शिराळ्यातील सोमवार पेठेत संदीप अरुण शेटे यांचे मोबाइलचे दुकान आहे. ३ डिसेंबर रोजी रात्री ८.३० ते शुक्रवारी सकाळी ९ च्या दरम्यान दुकानाचे कुलूप तोडून २ लाख रुपये किमतीचे २० ते २२ मोबाइल चोरट्याने लंपास केले हाेते. या प्रकरणाचा तपास हवालदार पी. व्ही. रजपूत करत होते.
सोमवार, दि. ८ रोजी पोलिसांना प्रकाश भालेकर हा शिराळा बाजारपेठेतील एका मोबाइल विक्रेत्याकडे बिल नसलेले मोबाइल विकण्यासाठी आल्याचे समजले.
सहायक निरीक्षक विशाल पाटील यांच्या सूचनेप्रमाणे शिराळा पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन पथकाने संशयित प्रकाश भालेकर ताब्यात घेतले. त्याच्याकडे शेटे यांच्या दुकानातून चोरीस गेलेल्या मोबाइलपैकी एक मोबाइल मिळून आला. अधिक चाैकशीत त्याने चाेरीची कबुली दिली. यानंतर पाेलिसांनी त्याच्या घरातून १ लाख ७४ हजार ४७५ रुपये किमतीचे मोबाइल व ४० हजार रुपये किमतीची गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी (एमएच १४ डीजी ३४३२) असा २ लाख १४ हजार ४०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी सहायक निरीक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार कालीदास गावडे, महेश साळुखे, प्रतापसिंह रजपुत, नितीन यादव, रणजित टोमके, तुषार जाधव यांनी केली.
या अगोदरही शिराळा पोलिसांनी मांगले येथील एटीएम चोरी, ३२ तोळे सोने व ५० हजार रुपये रकमेची चोरी, दुचाकी चोरीचे ३ गुन्हे, शिराळा येथील औषध दुकानातील चोरी आदी गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
फाेटाे : ०८ प्रकाश भालेकर