‘वायफळे’त भारनियमनाने द्राक्षबागा संकटात
By Admin | Updated: December 26, 2015 00:14 IST2015-12-25T23:15:10+5:302015-12-26T00:14:53+5:30
रब्बीही धोक्यात : शेतकऱ्यांना दिवसभरात चार तासच वीज पुरवठा

‘वायफळे’त भारनियमनाने द्राक्षबागा संकटात
प्रवीण पाटील --सावळज -वायफळेसह परिसरात यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे शेतीसाठी पाण्याची चणचण भासत असतानाच गेल्या काही दिवसांपासून महावितरणने २० तास भारनियमन सुरु केल्याने, जे काही थोडेफार पाणी आहे तेही शेतीसाठी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी असूनदेखील फक्त ४ तासात द्राक्षबागा व रब्बीच्या पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.आठवड्यात मंगळवार वगळता तीन दिवस रात्री व तीन दिवस दिवसा ८ तास शेती पंपासाठी वीज देण्यात येत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून शुक्रवार ते रविवार फक्त ४ तासच वीज चालू करण्यात येते. त्यामध्येही अनेकवेळा विजेचा लपंडाव सुरु असतो. त्यामुळे फक्त ४ तासात द्राक्षबागांसह गहू, मका, हरभरा यासह चारा पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. पाणी असून देखील पिके वाळण्याची वेळ आली आहे.
द्राक्षबागा सध्या ऐन भरात असल्यामुळे बागांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. या भागामध्ये कोणत्याही शासकीय योजनेचे पाणी येत नसल्यामुळे कूपनलिका व विहिरी याद्वारे शेतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र फक्त चार तासात शेतीला पाणी देणे शक्य होत नाही. अगोदरच दुष्काळाने मेटाकुटीस आलेला शेतकरी भारनियमनामुळे हतबल झाला आहे. पूर्वीप्रमाणे ८ तास व सुरळीतपणे महावितरणने वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना
यावर्षी द्राक्ष बागायतदारांना हवामानाने चांगली साथ दिली आहे. त्यामुळे द्राक्षबागांवर रोगांचा कमी फै लाव आहे. मात्र अगोदरच दुष्काळामुळे पाणीटंचाई व त्यातच वीस-वीस तास भारनियमन, यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. भारनियमन म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना झाला आहे.