जिल्ह्यात महापुराच्या संकटाचा भार हलका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:26 IST2021-07-29T04:26:44+5:302021-07-29T04:26:44+5:30
सांगली : गेला आठवडाभर महापुराचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या डोईवरील संकटाचा भार आता हलका होत आहे. संकटाचे ढग हटत ...

जिल्ह्यात महापुराच्या संकटाचा भार हलका
सांगली : गेला आठवडाभर महापुराचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या डोईवरील संकटाचा भार आता हलका होत आहे. संकटाचे ढग हटत असताना पुरात झालेल्या हानीने पूरग्रस्त हादरले आहेत. नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम बुधवारपासून सुरू झाले आहे.
जिल्ह्यात कृष्णा व वारणा नद्यांची अनेक ठिकाणची पाणीपातळी आता इशारा पातळीखाली गेली आहे. सांगली शहरातील पाणीपातळी अद्याप इशारा पातळीच्या वर आहे. त्यामुळे अद्याप काही भागात महापुराचे पाणी कायम आहे. दोन्ही नद्यांच्या महापुरात अडकलेले बहुतांश रस्ते, पूल रिकामे झाल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे. बंद असलेले एसटीचे अनेक मार्गही सुरू झाले आहेत. महापूर ओसरण्याची गती अद्याप मंदच आहे. गतीने पाणी उतरून ते पात्रात गेल्यानंतरच जनजीवन पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.
वारणा, कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी आहे. कोयना धरण क्षेत्रात बुधवारी दिवसभरात सरासरी २६ तर वारणा धरण परिसरात दिवसभरात सरासरी ४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. ढगांची दाटीही कमी झाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या आठवडाभरात जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्यामुळे पूर ओसरेपर्यंत कोणताही धोका नदीकाठच्या लोकांना नाही.
चौकट
जिल्ह्यातील कृष्णेची पाणीपातळी, मि. मी.
(बुधवारी सायं. ६ पर्यंत)
बहे ८.९
ताकारी ३८.६
भिलवडी ४१.२
सांगली ४३.१
अंकली ४९.१०
म्हैसाळ ५९.६
चौकट
चोवीस तासांत पाच फुटाने घट
मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सायंकाळपर्यंत म्हणजेच चोवीस तासांत सांगलीतील पाणीपातळीत केवळ ५ फुटांनी घट झाली आहे. पूर ओसरण्याची गती अद्याप मंद आहे.
चौकट
सांगली-कोल्हापूर मार्ग सुरू
सांगली ते कोल्हापूर मार्गावरील पुराचे पाणी हटल्याने या मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. मंगळवारी सांगली ते पेठ मार्ग आयर्विन पुलावरून सुरू झाला होता.
चौकट
व्यापारी पेठा, घरांत चिखलाचा थर
महापुरातून मुक्त झालेली दुकाने, घरांमध्ये चिखलाचा थर साचला आहे. त्यातच महापालिकेचा पाणीपुरवठा काही भागात अपुरा होत असल्याने स्वच्छता करताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.