अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST2021-03-05T04:25:22+5:302021-03-05T04:25:22+5:30
सांगली : तब्बल साडेसहा लाख लोकसंख्येचे आपत्तीपासून संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या अग्निशमन विभागाकडे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा वानवा आहे. मंजूर पदांपैकी ...

अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा भार
सांगली : तब्बल साडेसहा लाख लोकसंख्येचे आपत्तीपासून संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या अग्निशमन विभागाकडे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा वानवा आहे. मंजूर पदांपैकी ५० टक्के पदे अजूनही रिक्त आहेत. या विभागाकडील १० हून अधिक कर्मचारी अप्रशिक्षित आहेत, तर मानधनावरील कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा गाडा हाकला जात आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरात कुठेही आग लागल्यास धावून जाणाऱ्या अग्निशमन विभागात बऱ्याच वर्षापासून भरती बंद आहे. वरिष्ठ पदांचा पदभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती सोपविण्यात आला आहे. त्यांच्या पदभाराबाबतही वादविवाद आहेत. लिपीक पदावरील कर्मचाऱ्यांकडेही अग्निशमनचा पदभार देण्यात आला आहे. निवृत्तीकडे झुकलेल्या कर्मचाऱ्यांचे कुठेही प्रशिक्षण झालेले नाही. तत्कालीन नगरपालिकेवेळी त्यांची भरती झाली. पण, भरती करतेवेळी केवळ एक प्रशिक्षण घेण्यात आले. त्याच्या प्रमाणपत्रावर या कर्मचाऱ्यांची अग्निशमन विभागात भरती करण्यात आली होती. आता मानधनावर काही कर्मचारी नव्याने घेतले आहेत. त्यांचे प्रशिक्षण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चौकट
निधी नसल्याने अडचण
महापालिकेत गेल्या २० वर्षांपासून भरती प्रक्रिया बंद आहे. शासनाच्या मंजुरीने काही जागांवर भरती करण्यात आली. पण, अग्निशमन विभागाकडे मात्र दुर्लक्ष झाले. महापुरानंतर उणिवा समोर आल्याने मानधनावर कर्मचारी घेण्यात आले आहेत.
प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने एखादेवेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
चौकट
अग्निशमन विभागातील मंजूर आणि रिक्त पदे
पद मंजूर पद रिक्त
अग्निशमन अधिकारी १ १
सब फायर ऑफीसर २ २
लिडिंग फायरमन ३ ३
फायरमन २५ ११
वाहनचालक २४ ८
क्लिनर ११ ६
चौकट
कार्यरत कर्मचाऱ्यांत तिघेच प्रशिक्षित
१. महापालिकेकडे अग्निशमन विभागात एकूण ७३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३९ पदे कार्यरत आहेत. त्यातही कायम कर्मचाऱ्यांपैकी तिघांचेच प्रशिक्षण झाले आहे.
२. कामाच्या सोयीसाठी मानधनावर १३ ते १४ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी मात्र प्रशिक्षण घेतले असल्याचे सांगितले जाते.
३. अग्निशमन विभागाकडे मंजूर पदांपैकी ३४ पदे रिक्त आहेत. या कर्मचाऱ्यांवरच अग्निशमन विभागाचा गाडा चालविला जात आहे.
चौकट
कोट
महापालिकेच्या अग्निशमन दलाला सक्षम करण्याचे काम सुरू आहे. आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीही करण्यात आली आहे. कर्मचारी भरतीचा प्रस्ताव अजून प्रलंबित आहे. नव्याने मानधनावर घेतलेले कर्मचारी हे प्रशिक्षितच आहेत.
- चिंतामणी कांबळे, प्रभारी अग्निशमन अधिकारी.