लांडगेवाडीत घरफोडी
By Admin | Updated: June 17, 2014 00:44 IST2014-06-17T00:44:05+5:302014-06-17T00:44:30+5:30
११ तोळे सोने लंपास

लांडगेवाडीत घरफोडी
शिरढोण (जि. सांगली) : लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे काल, रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी घर फोडून चार लाख रुपयांचे अकरा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. हा चोरीचा प्रकार आज, सोमवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत सुशीला विठ्ठल कदम यांनी फिर्याद दिली आहे. चोरीमुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे.
सुशीला कदम यांचे गावालगत घर आहे. त्या काल जाधववाडी येथे माहेरी गेल्या होत्या. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या दरम्यान कदम यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा एक्सा करवतीने कापून आत प्रवेश केला. तत्पूर्वी चोरट्यांनी कदम यांनी भाड्याने दिलेल्या खोल्यांना बाहेरून कडी लावली होती. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट कटावणीने उचकटून त्यातील स्टीलच्या डब्यामधील पाच तोळ्यांच्या पाटल्या, पावणेतीन तोळ्यांचा लक्ष्मीहार, सव्वातीन तोळ्यांची मोहनमाळ असे सुमारे चार लाख रुपयांचे अकरा तोळे सोने लंपास केले. चोरट्यांनी घरातील भांडी, डबे, कपडे तसेच इतर साहित्य इतरत्र विस्कटले होते. सुशीला कदम सकाळी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. शिरढोण येथील बॅँकेत ठेवलेले दागिने त्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच घरी आणले होते.
उकाड्यामुळे पंखे सुरू असल्याने त्याच्या आवाजामुळे भाडेकरूंना चोरीचा प्रकार समजला नाही. सकाळी दार उघडत नसल्याने त्यांनी गावातील नातलगांना दूरध्वनी करून कडी काढण्यास बोलावले.
दरम्यान, सांगलीहून मागवलेल्या श्वानाने घरापासून दक्षिण बाजूस दीड किलोमीटरपर्यंत माग काढला. तेथे राजाराम कदम यांच्या शेतामध्ये श्वान घुटमळले. या शेताला लागून ओढा आहे. या ओढ्यामधून चोरटे वाहनाने गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलीस निरीक्षक युवराज मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक जे. जे. पवार, पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरू, आदींनी घराची पाहणी केली. (वार्ताहर)