सराफ व्यावसायिकांचा उद्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:29 IST2021-08-22T04:29:27+5:302021-08-22T04:29:27+5:30
सांगली : हॉलमार्क युनिक आयडीला विरोध करण्यासाठी सांगली जिल्हा सराफ समितीच्यावतीने येत्या सोमवारी २३ ऑगस्टला सराफ बाजार बंद ठेवण्यात ...

सराफ व्यावसायिकांचा उद्या बंद
सांगली : हॉलमार्क युनिक आयडीला विरोध करण्यासाठी सांगली जिल्हा सराफ समितीच्यावतीने येत्या सोमवारी २३ ऑगस्टला सराफ बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.
समितीचे अध्यक्ष जितेंद्र पेंडुरकर व सचिव पंढरीनाथ माने यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हॉलमार्क युनिक आयडी धोरणाविरोधात देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. वास्तविक युनिक आयडी ही एक विध्वसंक प्रक्रिया आहे. ती सक्तीची करण्यात आली आहे. दागिन्यांची कोणतीही सुरक्षा न देता नोंदणी रद्द करणे, दंडात्मक कारवाई करणे, जप्ती करणे यासारख्या जाचक तरतुदी यात आहेत. अशा प्रकारच्या धोरणाने या उद्योगात ‘इन्स्पेक्टर राज’ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनमानी अंमलबजावणी विरोधात आमचा शांततापूर्ण निषेध आहे.
हा कायदा अव्यवहार्य आणि अंमलात येण्यासारखा नाही. हा कायदा ग्राहकांच्या हिताविरोधातही आहे आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. युनिक आयडीची प्रक्रिया एकदम क्लिष्ट आहे. त्यामुळे ग्राहक आणि ग्रामीण व निमशहरी ज्वेलर्सना त्रासदायी ठरणार आहे. ही प्रक्रिया डेटा गोपनीयता आणि वैयक्तिक, व्यावसायिक गोपनीयतेमध्ये हस्तक्षेप करणारी आहे.
सध्या नवीन दागिन्यांना हॉलमार्क करण्यासाठी जवळपास ५ ते १० दिवस लागतात. परिणामी ग्राहकांना दागिने ताब्यात मिळण्यासाठी तेवढा जादा वेळ खर्च करावा लागतो. पर्यायाने ग्राहकांची नाराजी व्यापाऱ्यांना सहन करावी लागत आहे. त्याचा परिणाम आमच्या व्यापारावर होत आहे. नवीन हॉलमार्किंग प्रक्रियेत दागिने कापणे, वितळवणे आणि स्क्रॅप करणे या गोष्टींचा समावेश आहे. दागिन्यांचे नुकसान झाल्यावर हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया कुचकामी ठरते. त्यानंतर ही प्रक्रिया त्वरित ग्राहक अनुकूल सेवा काढून टाकते. दागिन्यांमधून ज्वेलरचे नाव काढून टाकणे, ग्राहकांना ज्वेलरची ओळख नसताना विकण्याची किंवा देवाण-घेवाण करण्याची इच्छा असेल तेव्हा त्यांच्या हितासाठी हानिकारक ठरेल. त्यामुळे या युनिक आयडीचे धोरण रद्द करावे, अशी मागणी समितीच्यावतीने करण्यात आली आहे.