इस्लामपुरात बिल्डरचा खून
By Admin | Updated: August 11, 2015 23:50 IST2015-08-11T23:50:02+5:302015-08-11T23:50:02+5:30
डोक्यात घातला दगड : हॉटेलच्या आवारात घटना; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका कविता पाटील यांचे पती

इस्लामपुरात बिल्डरचा खून
इस्लामपूर : शहरातील बांधकाम व्यावसायिक, बिल्डर राजेंद्र शामराव पाटील (वय ४८, रा. गणेश मंडई, कोट भाग दत्त मंदिराजवळ, इस्लामपूर) यांचा त्यांच्याच मालकीच्या पेठ-सांगली रस्त्यावरील हॉटेल मनोरमाच्या आवारात अज्ञातांनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. ही थरारक घटना मंगळवारी रात्री साडेसात ते पावणेआठच्या सुमारास घडली.
दगडाने केलेल्या हल्ल्यात त्यांचा चेहरा विद्रुप झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. आर्थिक व्यवहार किंवा हॉटेल आणि जागेचा व्यवहार अशा कारणातून ही घटना घडल्याची शक्यता गृहित धरून पोलीस यंत्रणेने तपास सुरू
केला आहे. हल्लेखोरांची संख्या एकापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. हल्लेखोरांनी हॉटेलचे प्रवेशद्वार कुलूप लावून बंद केले होते. बिल्डर व्यावसायिक असलेले राजेंद्र पाटील हे नगरसेविका कविता पाटील यांचे पती होते. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच शहरातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनीही धाव घेतली होती. पोलीस उपअधीक्षक वैशाली शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एल. राठोड, सहायक पोलीस निरीक्षक संगीता पाटील, पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरू यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी आल्यावर तेथील गर्दी पांगवून तपासाला सुरुवात केली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृत राजेंद्र पाटील यांनी दीड वर्षापूर्वी पेठ रस्त्यावरील हॉटेल मनोरमा, परमीट रुम व बीअरबार खरेदी केले होते. त्यानंतर त्यांनी ते हॉटेल चालविण्यास दिले होते. मात्र परमीट रुम व बीअरबारचा परवाना वेळेत नूतनीकरण न केल्याने चार महिन्यांपासून हॉटेल बंद होते.
मंगळवारी या हॉटेलमध्ये राजेंद्र पाटील हे आपल्या मित्रांसमवेत रात्री एकत्रित जेवण करणार होते. त्याची तयारी करण्यासाठी ते आपल्या सहकारी कामगारासमवेत हॉटेलवर आले होते. साडेसातच्या सुमारास त्यांचा सहकारी सिगारेट आणण्यासाठी बाहेर पडला. त्याचवेळी अज्ञातांनी राजेंद्र पाटील यांच्या डोक्यात दगड घातला. रस्त्यालगतच्या प्रवेशद्वाराच्या पश्चिम बाजूला रक्ताच्या थारोळ्यात ते पडले होते.
घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथीलच कुलूप प्रवेशद्वाराला लावून पोबारा केला. काही वेळानंतर पाटील यांचा सहकारी कामगार परत आला. त्यावेळी त्याला प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याचे आणि आतील बाजूस राजेंद्र पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडल्याचे दिसून आले. त्याने पाटील यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. पाटील यांच्या पत्नी कविता पाटील व भाऊ मोहन पाटील यांनी तातडीने तेथे धाव घेतली. प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, तोपर्यंत त्यांचा श्वास सुरु होता. मात्र अति रक्तस्रावामुळे त्यांचा तेथेच मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (वार्ताहर)
नेत्यांची धाव...!
राजेंद्र पाटील हे बांधकाम व्यावसायिक होते. पी अॅड पी फर्मच्या माध्यमातून ते हा व्यवसाय पाहत होते. त्यांची पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत, तसेच पाटील उत्कृष्ट बॅडमिंटनपटू होते. त्यांच्या खुनाची घटना समजताच शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह उद्योजक, खेळाडूंनी घटनास्थळी धाव घेतली होती.
बघ्यांची गर्दी...
वाहतूक विस्कळीत !
पेठ-सांगली रस्त्यावर ही घटना घडल्याने तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनाही हा जमाव नियंत्रित होत नव्हता. त्यामुळे तेथील वाहतूकही विस्कळीत होत होती. काही वेळाने वाहतूक पोलिसांनी तेथे धाव घेत जमावाला हटवून वाहतूक सुरळीत केली.