इस्लामपुरात बिल्डर लॉबीला खुनामुळे हादरा
By Admin | Updated: August 12, 2015 23:22 IST2015-08-12T23:22:47+5:302015-08-12T23:22:47+5:30
भूखंड माफिया फोफावले : बिल्डर आणि गुंडांचे रॅकेट मोडीत काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान

इस्लामपुरात बिल्डर लॉबीला खुनामुळे हादरा
अशोक पाटील- इस्लामपूर राजकीय पदाचा वापर करून कोट्यवधीचे भूखंड लाखाच्या किमतीत पदरात पाडून घेण्याचा बेकायदेशीर व्यवसाय इस्लामपूर शहरात जोरात सुरू आहे. भूखंड माफिया, बिल्डर आणि गुंडांना राजकीय नेत्यांचे पाठबळ आहे. त्यातूनच गैरकृत्ये फोफावली आहेत. मंगळवारी रात्री झालेल्या बांधकाम व्यावसायिक राजेंद्र पाटील यांच्या खुनामुळे बिल्डर लॉबीला हादरा बसला आहे.
राजेंद्र पाटील यांनी इस्लामपुरात पी. पी. कन्स्ट्रक्शन या नावाने फर्म सुरू करून बांधकाम व्यवसायात जम बसवला होता. इस्लामपूर—पेठ रस्त्यावरील शहरालगत असलेल्या दहा गुंठे जागेवर असलेल्या हॉटेल व बारची त्यांनी खरेदी केली होती. हे हॉटेल दुसऱ्याला चालविण्यासाठी दिले होते. या हॉटेल व्यवसायातूनच त्यांचा खून झाल्याची चर्चा आहे. या घटनेने बिल्डर लॉबीला हादरा बसला आहे.
राजेंद्र पाटील हे सर्वसामान्य कुटुंबातील होते. अभियंता झाल्यानंतर ते बांधकाम व्यवसायात आले. सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. शहरातील मोक्याच्या जागा खरेदी करून त्यावर संकुले उभारण्यात त्यांचा हातखंडा होता. एन. ए. गु्रपचे जयवंत पाटील यांना सोबत घेऊन जुन्या भाजी मंडई परिसरात मोठे व्यापारी संकुल उभे करण्यात ते यशस्वी झाले होते. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या ताकदीवर मोक्याच्या जागा खरेदी करण्याचा सपाटाच लावला होता. या जागांवर पी. पी. कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. बांधकाम व्यवसायातील यशानंतर त्यांनी हॉटेल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. इस्लामपूर—पेठ रस्त्यावरील शहराजवळ असलेले १0 गुंठे जागेतील वनश्री हॉटेल त्यांनी खरेदी केले. बांधकाम व्यवसायामुळे त्यांना या व्यवसायाकडे पूर्ण लक्ष देता येत नव्हते. त्यामुळे हे हॉटेल त्यांनी एका पक्षाच्या कार्यकर्त्यांना चालविण्यास दिले होते. यापोटी पाटील यांना महिन्याला ५0 हजार रुपये भाडे देण्याचे ठरल्याचे समजते. या आर्थिक व्यवहारातूनच पाटील यांचा खून झाल्याची चर्चा शहरात आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
राजेंद्र पाटील यांच्या खुनामुळे बिल्डर लॉबी, भूखंड माफिया आणि गुंडांना हादरा बसला आहे. शहरातील भूखंड नोटरी करून त्यावर बेकायदेशीर इमारती उभ्या करण्यात भूखंड माफियांचा हातखंडा आहे. त्यांना शहरातील राजकीय नेत्यांसह गुंडांचीही साथ आहे. जागेतीत कुळ काढणे, त्या जागा कमी किमतीत खरेदी करणे आणि त्यावर मोठ्या इमारती बांधणे, हा व्यवसाय सध्या जोमात आहे. त्यातून जागेचे भाव आणि फ्लॅटचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे बहुतांशी इमारतींमध्ये फ्लॅट विक्रीविना पडून आहेत. याचा परिणाम बांधकाम व्यावसायिकांच्या व्यवहारावर झाला आहे.
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार : पाटील
वाळवा तालुक्यात आर्थिक सुबत्ता आहे. त्यामुळे जमिनीचे दर भडकले आहेत. याचा फायदा काही भूखंड माफियांनी घेतला आहे. बोगस खरेदी व्यवहाराच्या अनेक तक्रारी पोलिसात दाखल झाल्या आहेत. एकाच जागेचे अनेक खरेदी व्यवहार झाल्याच्याही तक्रारी आहेत. महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी आहेत. किरकोळ तक्रारीवरून खुनाचे प्रकार घडत आहेत. या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण पाटील यांनी दिला आहे.