समांतर पूल बांधा, पण व्यापारपेठेला धक्का नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:00+5:302021-04-02T04:28:00+5:30
सांगली : कृष्णा नदीवरील ‘आयर्विन’ला समांतर पूल व्हावा, पण नव्या पुलामुळे व्यापारपेठ आणि चिंचबागेला धक्का लागू नये, अशी भूमिका ...

समांतर पूल बांधा, पण व्यापारपेठेला धक्का नको
सांगली : कृष्णा नदीवरील ‘आयर्विन’ला समांतर पूल व्हावा, पण नव्या पुलामुळे व्यापारपेठ आणि चिंचबागेला धक्का लागू नये, अशी भूमिका सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी गुरुवारी घेतली. लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरिकांना विश्वासात घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. लिंगायत स्मशानभूमीजवळील पुलाला मात्र त्यांनी विरोध दर्शविला.
आयर्विनच्या समांतर पुलाबाबत पवार यांनी पत्रकार बैठकीत भूमिका स्पष्ट केली. यावेळी नागरिक हक्क संघटनेचे नेते सतीश साखळकर, रिक्षा संघटनेचे महादेव पवार, राम देशपांडे, रेखा पाटील उपस्थित होते. पवार म्हणाले, आयर्विन पूल ऐतिहासिक ठेवा आहे. तो जपला पाहिजे. सांगलीची बाजारपेठही वाचविण्याची जबाबदारी साऱ्यांची आहे. समांतर पूल न झाल्यास ही बाजारपेठ उद्ध्वस्त होऊ शकते. पुलामुळे कापडपेठेतील दुकाने पाडावी लागणार असतील, तर ते चुकीचे आहे. तसा प्रयत्न कुणीही करू नये. आम्ही व्यापाऱ्यांसोबत काठ्या घेऊन उभे राहू. मारुती चौक आजही सांगलीची सुरक्षा करायला समर्थ आहे. समांतर पुलावरून अवजड वाहने, मोठी प्रवासी वाहने शहरात आणण्यास बंदी करता येईल. खरेदीनिमित्ताने शहरात येणाऱ्या वाहनांसाठी जनावर बाजार, वैरण बाजार येथे पार्किंगची अत्याधुनिक सुविधा निर्माण करता येऊ शकते. त्यासाठी महापालिकेने जबाबदारी घेतली पाहिजे.
समांतर पुलाबाबत अनेक मतमतांतरे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग यावर भूमिका स्पष्ट करायला तयार नाही. लोकप्रतिनिधी एकमेकांशी बोलायला तयार नाहीत. सर्वपक्षीय नेते, व्यापारी, सामाजिक कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
चौकट
व्यापार मोडून पडेल
सांगलीवाडीतून लिंगायत स्मशानभूमीजवळून शंभरफुटीपर्यंत नवा रस्ता व पूल बांधण्याचे नियोजन आहे. यामुळे सगळी वाहतूक शहराबाहेरून जाईल. त्यामुळे छोटे व्यापारी, रिक्षावाले, भाजी-फळवाले, हातगाडीवाले, छोटे दुकानदार, किराणा-भुसार, कापड व्यापार मोडून पडेल. शंभर फुटीकडे वाहतूक वळवण्याचा आग्रह सांगलीच्या अस्तित्वावर घाला घालणारा ठरणार आहे, असे ते म्हणाले.