मान्यताप्राप्त एसटी संघटनेकडून दलालीचा उद्योग
By Admin | Updated: April 1, 2015 00:00 IST2015-03-31T23:01:32+5:302015-04-01T00:00:50+5:30
जयप्रकाश छाजेड : कामगारांच्या बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जावे लागेल

मान्यताप्राप्त एसटी संघटनेकडून दलालीचा उद्योग
सांगली : मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या, त्यांच्यावरील कारवाईला स्थगिती मिळविण्याच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडे दलाली सुरू केली आहे, अशी टीका महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी आज (मंगळवारी) केली. एसटी कामगारांच्या बँकेमध्ये आणि संघटनेच्या निधीमध्ये हनुमंत ताटे आणि शिवाजीराव चव्हाण यांनी घोटाळा केला असून, त्याप्रश्नी त्यांना लवकरच तुरुंगात घालवू, असा इशाराही त्यांनी दिला.
इंटकच्या पुणे विभागातील कर्मचाऱ्यांचा मेळावा सांगलीत झाला. यावेळी छाजेड बोलत होते. ते म्हणाले की, कामगार संघटनेचे नेते ताटे आणि चव्हाण या दोघांनीही आपल्या मुलांना एसटी कामगार बँकेत नोकरीला लावले. बँकेतील ३५० कोटी रुपये कमिशन घेऊन अन्य राज्यात गुंतवणूक केली. या सर्व घोटाळ्यांचा येत्या महिन्यात पंचनामा करून चव्हाण आणि ताटे यांना तुरुंगात घालविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
कामगार संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या, कामाच्या वेळा ठरविण्यासाठीही अधिकाऱ्यांबरोबर दलालीचे उद्योग केले आहेत. या गैरकारभाराचे सर्व पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षा शैलजा पाटील यांनी एसटी कामगारांना पाठिंबा दिला.
रावसाहेब माणकापुरे आर. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मनोज पाटील, महेश पाटील, राज्य महिलाध्यक्षा सारिका शिंदे, सातारा विभागीय अध्यक्ष एम. के. भोसले, सोलापूर विभागाचे विभागीय सचिव सुनील मालप, आनंदराव दोपारे, राजू माळी यांनीही महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेवर टीका केली. (प्रतिनिधी)
१५ मे रोजी संप
एसटी कामगारांना २५ टक्के वेतनवाढ मिळाली पाहिजे, यासाठी दि. १५ एप्रिलरोजी राज्यभरातील कामगारांचे आॅनलाईन मतदान घेणार आहे. त्यानंतर दि. १५ मेरोजी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला.