वांगीतील ब्रिटिशकालीन विहिरीची मोठ्याप्रमाणात पडझड
By Admin | Updated: September 11, 2014 23:06 IST2014-09-11T22:36:48+5:302014-09-11T23:06:49+5:30
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : ग्रामस्थांतून संताप; विहिरीचे पुनर्बांधकाम करण्याची गरज

वांगीतील ब्रिटिशकालीन विहिरीची मोठ्याप्रमाणात पडझड
मोहन मोहिते - वांगी -वांगी येथील ब्रिटिशकालीन विहिरीची सुरू असलेली पडझड थांबवून या विहिरीचे पुनर्बांधकाम होणे गरजेचे आहे.
वांगी (ता. कडेगाव) येथील लोकवस्तीत नाथ मंदिराशेजारी नाथाची विहीर म्हणून प्रसिध्द असणाऱ्या विहिरीचे काम १९२० मध्ये ब्रिटिशांनी केले. १९२० मध्ये गावात साथीच्या रोगाने थैमान घातले होते. यावेळी लोकांना पिण्यास योग्य अशा पाण्याची व्यवस्था नव्हती. गावाला साथीच्या रोगापासून वाचवावे व पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी ब्रिटिश सरकारने तातडीचा निर्णय घेऊन त्याकालीन गावात असणारे मुलकी पाटील महादेव यशवंत पाटील यांना ३५० रुपये देऊन विहिरीचे काम चालू करण्याची जबाबदारी दिली. त्यानुसार ३५ फूट व्यासाची सुबक, पूर्णपणे दगडी बांधकामातील, आतमध्ये उतरण्यासाठी दगडी पायऱ्या, त्यावर दगडी कमान अशी शुशोभित व आकर्षक विहीर आहे.
गावातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना या विहिरीतील पाणी मिळावे, यासाठी ब्रिटिशांनी या विहिरीवर एका माणसाची नेमणूक केली होती. साथीच्या रोगावेळी संपूर्ण गावाला शुध्द पाणी देणाऱ्या विहिरीत आता मात्र घाणीचे साम्राज्य आहे. ही विहीर मुख्य वळण रस्त्यावर असल्यामुळे त्याकाळी संपूर्ण दगडाचे संरक्षण कठडा उभा करण्यात आला होता. आता मात्र हा संपूर्ण कट्टा विहिरीत कोसळल्यामुळे या रस्त्यावरून वाहने घेऊन जाणे धोकादायक बनले आहे.