उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST2021-08-13T04:30:53+5:302021-08-13T04:30:53+5:30
फोटो दुपटे शरद जाधव/लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दारिद्र्यरेषेखालील व आर्थिकदृ्ष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबांसाठी फायदेशीर असलेल्या उज्ज्वला गॅस योजनेच्या ...

उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?
फोटो दुपटे
शरद जाधव/लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दारिद्र्यरेषेखालील व आर्थिकदृ्ष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबांसाठी फायदेशीर असलेल्या उज्ज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची नुकतीच घोषणा करण्यात आली. गरिबांना चुलीसमोर स्वयंपाक करायला लागू नये यासाठी योजना सुरू करण्यात आली असली तरी गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य अडचणीत आले असताना, उज्ज्वलाचे लाभार्थी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच त्यांनी गॅसला बाजूला ठेवत पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे.
सन २०१६ मध्ये केंद्र सरकारच्यावतीने दारिद्रयरेषेखालील कुटुंबासाठी उज्ज्वला योजना सुरू केली. २०१८ मध्ये योजनेचा विस्तार करण्यात आला, तर नुकतेच केंद्र सरकारने आता ‘उज्ज्वला २.०’ योजनेची घोषणा केली आहे. पूर्णपणे मोफत गॅस कनेक्शन मिळत असले तरी सिलिंडरच्या वाढतच चाललेल्या किमतीमुळे गोरगरिबांचे बजेट कोलमडले आहे.
चौकट
सिलिंडर भरणे कसे परवडणार?
योजना सुरू होण्याअगाेदर आम्ही चुलीचाच वापर करत होतो. मात्र, गावात माहिती मिळाल्यानंतर कनेक्शन घेतले. मात्र, आता वर्षभरापासून त्याचा वापर करत नाही. रोजंदारीवर जाणाऱ्या आम्हा कुटुंबाला गॅस टाकी भरणे परवडत नाही.
मालन ढवळे, गृहिणी.
कोट
गेल्या अनेक वर्षांपासून गॅसचा वापर करत आहोत. मात्र, गॅस सिलिंडर भरून घेण्यासाठी अडचणी येत आहेत. पाचशेपर्यंत दर होता तेव्हा परवडत होते. आता साडेआठशेवर दर पोहोचला आहे. आमच्या कुटुंबाला महिन्याला एक सिलिंडर लागतो. त्यामुळे पुन्हा चूल सुरू केली आहे.
लक्ष्मी खोत, गृहिणी.
कोट
विना धूर आणि त्रास न होता गॅसवर स्वयंपाकाची सवय लागली आहे. मात्र, कोरोनामुळे अगोदरच रोजगार मिळत नाही. त्यामुळे एकाचवेळी इतकी रक्कम भरून गॅस घेणे परवडत नाही. उलट शासनाने यासाठीही आम्हाला अनुदान द्यावे.
आक्काताई बुर्ले, गृहिणी.
चौकट
जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेले उज्ज्वला कनेक्शन ११०१८९
गॅस सिलिंडरचे दर (रुपयांत
जानेवारी २०१९ ५५९
जानेवारी २०२० ८७२
जानेवारी २०२१ ७६०
ऑगस्ट २०२१ ८५१