वऱ्हाडी वाढले, पण मुहूर्ताअभावी शुभमंगल सावधान नव्हे विश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST2021-08-17T04:31:30+5:302021-08-17T04:31:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लग्नातील वऱ्हाडी वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतरही लग्न सोहळ्यांना गती मिळणे मुश्कील झाले आहे. लगीनसराई ...

The bridegroom grew up, but for the lack of a moment, he did not rest | वऱ्हाडी वाढले, पण मुहूर्ताअभावी शुभमंगल सावधान नव्हे विश्राम

वऱ्हाडी वाढले, पण मुहूर्ताअभावी शुभमंगल सावधान नव्हे विश्राम

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : लग्नातील वऱ्हाडी वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतरही लग्न सोहळ्यांना गती मिळणे मुश्कील झाले आहे. लगीनसराई संपल्यानंतर आता लवकर मुहूर्तच नसल्याने नियोजित मंगल सोहळ्यांना विश्राम मिळाला आहे. साखरपुडा, वाढदिवस, मंगळागौर कार्यक्रमांसाठीच आता कार्यालयांमध्ये काही प्रमाणात बुकिंग सुरु झाले आहे.

खुल्या जागेतील सोहळ्यांसाठी २०० तर बंदिस्त जागी होणाऱ्या लग्न सोहळ्यांसाठी १०० लोकांची परवानगी शासनाने दिली आहे. इच्छुक वधू-वर, त्यांचे कुटुंबीय, मंगल कार्यालयवाले, बँडवाले, केटरिंगवाले अशा सर्व घटकांना शासन निर्णयाने फारसा दिलासा मिळाला नाही. काढीव मुहूर्तावर मागील महिन्यापर्यंत काही लग्नसमारंभ पार पडले, मात्र सद्यस्थितीत लग्न सोहळ्यांना ‘ब्रेक’ मिळाला आहे. शासनाच्या या निर्णयानंतर साखरपुड्यांच्या कार्यक्रमांना गती मिळाली आहे. कार्यालयांमध्ये शंभर लोकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम आता सुरु झाले आहेत. याशिवाय वाढदिवस, एकसष्ठी, पंच्याहत्तरी तसेच मंगळागौर कार्यक्रमांसाठीही कार्यालयांकडे विचारणा करण्यात येत आहे.

सध्या गौण काळ सुरु आहे. लग्नांचे कोणतेही मुहूर्त सध्या नाहीत. पंचांगकर्त्यांनीही ऑगस्ट महिन्यात मुहूर्त दिलेले नाहीत. चातुर्मासाचा काळही विवाह सोहळ्यांसाठी वर्ज्य मानला जातो. त्यामुळे शुभमंगल सावधान सोहळे आता विश्राम मोडमध्ये गेले आहेत.

चौकट

लग्न सोहळ्यांसाठी हे आहेत नियम

खुल्या लॉनमधील लग्न सोहळ्यांना २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे, मात्र याठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

बंदिस्त कार्यालयात १०० लोकांसाठी परवानगी दिली आहे. याशिवाय सोहळ्याला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क बंधनकारक आहे. सोहळ्यात सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतराची अटही घालण्यात आली आहे.

चौकट

साखरपुड्याचेच मुहूर्त

ऑगस्ट महिन्यात ३, ४, ११, १२, १४, १८, २०, २१, २२, २३, २५, २६, २७, ३०, ३१ हे मुहूर्त साखरपुड्यासाठी दिले आहेत. लग्न मुहूर्त नाहीत.

कोट

आता परवानगी मिळून काय उपयोग

लगीनसराईतच अशाप्रकारची परवानगी मिळायला हवी होती. आता लवकर मुहूर्त नाहीत. त्यामुळे सोहळ्यांवर अवलंबून कोणत्याही घटकाला याने मोठा दिलासा मिळणार नाही. किरकोळ कार्यक्रमांचा आधार मिळेल.

- संतोष भट, मंगल कार्यालय चालक

कोट

लग्न मुहूर्तच नसल्याने आता सोहळे बंद आहेत. त्यामुळे शासनाच्या निर्णयानंतरही बँड व्यवसाय शांतच आहे. सलग दोन वर्षांपासून आम्ही नुकसान सोसत आहोत.

- सचिन जाधव, बँडवाले

कोट

सध्या नोव्हेंबरमधील लग्न सोहळ्यांसाठी विचारणा सुरु आहे. तरीही तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने वधू-वर पालकांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे.

- उल्का माने, लॉन व कार्यालय चालक

कोट

सध्या लग्न मुहूर्त नाहीत. पुढील तीन महिन्यांतही लग्न सोहळे टाळले जातात. काढीव मुहूर्त असतात, मात्र त्यालाही फारसा प्रतिसाद नाही.

- श्रीपाद पाटील, भटजी

Web Title: The bridegroom grew up, but for the lack of a moment, he did not rest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.