विट्यात बांधकाम साहित्य चोरट्यांनी घातला धुमाकूळ
By Admin | Updated: November 28, 2014 23:47 IST2014-11-28T22:47:32+5:302014-11-28T23:47:03+5:30
बांधकाम मालक हैराण : वीट, सिमेंट, सळई रातोरात लंपास

विट्यात बांधकाम साहित्य चोरट्यांनी घातला धुमाकूळ
दिलीप मोहिते - विटा सांगली जिल्ह्यात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या विटा शहरात घरफोडीची मालिका सुरू असतानाच आता अज्ञात चोरट्यांनी शहरात सुरू असलेल्या नवीन घर बांधकामांच्या साहित्यावर डल्ला मारून रातोरात वीट, सिमेंट, सळई, वाळू यासह अन्य साहित्य लंपास करण्यास सुरुवात केली आहे. यात सहा ते सातजणांची टोळी कार्यरत असल्याची चर्चा असून, महागडे बांधकाम साहित्य पळविण्याचा प्रकार घडत असल्याने बांधकाम मालक हैराण झाले आहेत.
उच्च, मध्यमवर्गीयांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत हक्काचे घर असावे, असे स्वप्न असते. ते सत्यात उतरविण्यासाठी शहरात अनेकांनी जागा खरेदी करून त्याठिकाणी घरांचे बांधकाम सुरू केले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्लॉटचे दर सर्वाधिक असल्याने अनेकांनी शहराबाहेर, उपनगरात व कमी लोकवस्ती असलेल्या ठिकाणी जागा खरेदी करून तेथे घर बांधकामासाठी वाळू, सिमेंट, खडी, सळई, वीट यासह अन्य बांधकाम साहित्य आणून टाकले आहे.
मात्र, शहरात नवीन बांधकामांवरील वीट, वाळू, सळई, खडी, सिमेंट आदी साहित्य रातोरात लंपास होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. शहरातील नेवरी, कऱ्हाड, तासगाव, खानापूर, मायणी या प्रमुख मार्गावरील उपनगरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणांहून मध्यरात्रीच्या सुमारास छोटा हत्ती, पीकअप, अॅपे आदी माल वाहतूक गाड्यांतून रातोरात सळई, वीट व सिमेंट पळविले जात आहे. बांधकामाचे साहित्य लंपास करणारी टोळी शहरात कार्यरत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे बांधकाम मालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, महागडे साहित्य खरेदी करून हक्काच्या घराचे स्वप्न साकारणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या सळईचा (स्टिल) दर प्रतिटन ४२ ते ४३ हजार रुपये असून, पाच हजार विटांच्या एका ट्रकचा दर २१ ते २२ हजार रुपये आहे. सिमेंटच्या एका पोत्याची किंमत ३३० ते ३४५ रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे घर बांधकामासाठी महाग असले तरीही साहित्य खरेदी करावेच लागत आहे. परंतु, ही अज्ञात चोरट्यांची टोळी मध्यरात्री वीट, सळई, सिमेंट, अन्य बांधकाम साहित्य रातोरात लंपास करीत आहे. शहरातील उपनगरांत याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने घराचे नवीन बांधकाम करणाऱ्या मालकांत खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)
नागरिकांचे गस्ती पथक...
विटा शहरातील वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त लाभदायक ठरलेली नाही. मंगळवारी मध्यरात्री कऱ्हाड रस्त्यावरील रंभा बजाज शोरूम, सरगम ढाबा यासह अन्य तीन ते चार ठिकाणी चोऱ्या झाल्यानंतर नागरिकांनी गस्त पथके तयार करून रात्रभर गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता घरफोड्यांबरोबरच नवीन बांधकाम साहित्य लंपास करणाऱ्यांवर नागरिकांच्या गस्ती पथकाचा वॉच राहणार असल्याचे सांगण्यात येते.
सध्या येरळा नदीपात्रातून चोरट्या वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू अनधिकृत असल्याने त्याचा दरही मनमानी पध्दतीने आकारला जात आहे. परंतु, बांधकामासाठी वाळू गरजेचीच असल्याने मिळेल त्या दरात वाळू खरेदी करण्याकडे बांधकाम मालकांचा कल आहे. वाळू तस्करांनी चोरून आणलेल्या वाळूवर या टोळीकडून डल्ला मारला जात असल्याने ही टोळी सध्या चोरावर मोर बनली आहे.