विट्यात घरफोडी; ११ लाख लंपास

By Admin | Updated: June 29, 2014 00:38 IST2014-06-29T00:32:29+5:302014-06-29T00:38:40+5:30

बंगला फोडला : दागिन्यांसह रोकड लांबविली

Brick; 11 lakh lumpas | विट्यात घरफोडी; ११ लाख लंपास

विट्यात घरफोडी; ११ लाख लंपास

विटा : येथील हणमंतनगर उपनगरातील मंडले वस्ती येथील दीपक परशुराम कोरे यांचा बंगला फोडून चोरट्यांनी ९० हजारांच्या रोकडसह एक किलो चांदी व ३५० ग्रॅम सोन्याचे दागिने असा सुमारे ११ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना काल, शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
पारे (ता. खानापूर) येथील दीपक कोरे कर सल्लागार असून, सध्या ते विट्यात स्थायिक आहेत. काल कोरे व त्यांचे मित्र शशिकांत शिंदे कामानिमित्त पुण्याला गेले होते. त्यामुळे घरी कोरे यांची पत्नी गौरी व लहान मुले होती. रात्री जेवण करून कोरे यांची पत्नी व मुले शिंदे यांच्या पत्नीकडे गेली होती. जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते.
आज, शनिवारी कोरे व शिंदे पहाटे सहाला विट्यात आले. त्यानंतर कोरे यांनी शिंदे यांच्या घरात असलेली पत्नी व मुलांना घरी नेले. त्यावेळी बंगल्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडल्याचे दिसून आले. आत जाऊन पाहिले असता चोरट्यांनी लोखंडी कपाट उचकटून त्यातील सोन्याचे दागिने, चांदी व रोख रक्कम लंपास केल्यास निदर्शनास आले. कोरे यांनी त्वरित विटा पोलिसांना कळविले. चोरट्यांनी कपाटातील ९० हजारांची रक्कम, ७० ग्रॅम वजनाचे चोख सोन्याचा रवे, १०० गॅ्रम सोन्याच्या बांगड्या, ५० ग्रॅमचे बाजूबंद, ६० ग्रॅमच्या सोन्याच्या बारा अंगठ्या, १५ ग्रॅमचे सोन्याचे ब्रेसलेट, २० ग्रॅमच्या दोन साखळ्या तसेच ३५ ग्रॅम वजनाची लक्ष्मीचा शिक्का असलेली सोन्याची तीन नाणी असे ३५० ग्रॅम सोने व एक किलो चोख चांदी लंपास केली. या दागिन्यांची किंमत बाजारभावाप्रमाणे १० लाख ४६ हजार रुपये असून, चोरट्यांनी रोख रकमेसह ११ लाख ३६ हजारांचा ऐवज लंपास केला असला, तरी पोलिसांत ६ लाख ३४ हजारांच्या चोरीची नोंद केली आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील, निरीक्षक अनिल पोवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दुपारी सांगलीहून ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले होते. कोरे यांच्या घरात श्वानाला पर्सचा वास देण्यात आला. त्यानंतर श्वानाने घराच्या बाजूला असलेल्या ओढ्याकडे धाव घेतली. मात्र, ते रस्त्यावर घुटमळले. (वार्ताहर)

Web Title: Brick; 11 lakh lumpas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.