महापौर पदासाठी गुडघ्याला बाशिंग

By Admin | Updated: January 13, 2016 01:33 IST2016-01-13T01:28:09+5:302016-01-13T01:33:32+5:30

अनेकजण सरसावले : पुढील महिन्यात निवडी; प्रशासनाचीही तयारी

Bowing to the knee for mayor's post | महापौर पदासाठी गुडघ्याला बाशिंग

महापौर पदासाठी गुडघ्याला बाशिंग

सांगली : महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी एक महिन्याचा कालावधी असला, तरी आतापासूनच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. संख्याबळाची जुळवाजुळव करीत नेत्यांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न सुरू झाला आहे. वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून नेत्यापर्यंत पोहोचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनानेही विभागीय आयुक्तांकडे महापौर निवडीच्या कार्यक्रमासंदर्भात प्रस्तावाची तयारी चालविली आहे.
महापौर विवेक कांबळे यांची ८ फेब्रुवारी रोजी मुदत संपत आहे. मुदतीपूर्वीच नवा महापौर निवडला जावा, यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या दोन दिवसांत विभागीय आयुक्तांकडे निवडीच्या कार्यक्रम निश्चितीसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे. नगरसचिव कार्यालयाने प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच नवा महापौर निवडला जाईल, असे दिसते.
महापालिकेत काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. काँग्रेसकडे ४२, राष्ट्रवादी २५, स्वाभिमानी आघाडी ११ नगरसेवक आहेत. पहिली अडीच वर्षे महापौरपद मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित होते. आता खुल्या प्रवर्गातून महापौर होणार असल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे.
महापालिकेत मदन पाटील यांचा शब्द अंतिम मानला जात होता. त्यांच्या शब्दापलीकडे जाण्याचे धाडस काँग्रेसच्या नगरसेवकांत नव्हते. पण मदनभाऊंच्या निधनानंतर सत्तेची गणिते बदलू लागली आहेत. काँग्रेसमध्येच गटा-तटाचे राजकारण सुरू झाले आहे. सध्या तीन ते चार गट कार्यरत आहेत. त्यात दबाव गटाच्या नावाखाली सर्वच पक्षातील ४० नगरसेवक एकत्र आले आहेत. महापौर पदासाठी इच्छुक असलेल्यांनी सदस्यांची खेचाखेची सुरू केली आहे.
असे असले तरी अजूनही मदनभाऊंच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांना मानणारा गट मोठा आहे. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पतंगराव कदम यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. सध्या तरी कदम यांनी पालिकेत लक्ष न घालण्याचे ठरविले आहे. पण भविष्यात त्यांना महापालिकेत लक्ष द्यावे लागेल.
काँग्रेसमध्ये काही दगाफटका झाल्यास राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या निर्णयावर सत्तेचा लंबक हलणार आहे. आमदार जयंत पाटील व मदन पाटील यांनी गेल्या वर्षभरात एकमेकांशी जुळवून घेतले होते. त्यात जयंतरावांनी जयश्रीतार्इंच्या राजकीय भवितव्याच्या निर्णयात आपलाही सहभाग असेल, असे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे जयंत पाटील व मदन पाटील गट एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का, याचा फैसलाही या निवडीवेळी होणार आहे.
सध्या महापौर पदासाठी हारुण शिकलगार, सुरेश आवटी, राजेश नाईक, रोहिणी पाटील यांची नावे चर्चेत आहेत. हे चौघेही मदनभाऊंचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ज्येष्ठतेनुसार हारुण शिकलगार व सुरेश आवटी यांची नावे महापौर पदासाठी घेतली जात आहेत. पण या दोन्ही नावाला काँग्रेससोबतच राष्ट्रवादीचाही हिरवा कंदील आवश्यक आहे. (प्रतिनिधी)


घोडेबाजार तेजीत
कधीकाळी पक्षनिष्ठा, नेत्यावरील निष्ठेच्या गप्पा मारणारे नगरसेवक आता गटा-गटात विभागले आहेत. नेत्यांचा शब्द प्रमाण मानून काम करणाऱ्यांची संख्या घटली आहे. केवळ काँग्रेसच नव्हे, तर राष्ट्रवादीतील नगरसेवकसुद्धा अर्थकारणात बुडाले आहेत. त्यातून दबाव गटाची स्थापना झाली आहे. या गटाकडे ४० नगरसेवक असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे त्यांची भूमिका सध्या तरी निर्णायक वाटते. आतापासूनच या गटाकडून महापौर पदासाठी बोली लावली जात आहे. कोण जादा बोली लावतो, त्याच्या पाठीशी राहणार असल्याचे दबाव गटातील काहीजण उघडपणे सांगतात. त्यामुळे महापौर निवडीवेळी घोडेबाजाराला वेग येणार आहे.

स्वाभिमानीचे अस्तित्व!
स्वाभिमानी आघाडीच्या माध्यमातून भाजप, शिवसेना, जनता दल, रिपाइं या पक्षांनी एकत्र निवडणूक लढविली होती. आता स्वाभिमानी आघाडीची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या गटाचे महापालिकेतील अस्तित्व संपणार आहे. नगरसेवकांचे पद कायम राहणार असले तरी, भविष्यात स्थायी समितीसह विविध समित्यांवरील प्रतिनिधीत्व सोडावे लागेल. अशा स्थितीत दबाव गटाच्या माध्यमातून स्वाभिमानीने अस्तित्वासाठी प्रयत्न चालविले आहेत.

Web Title: Bowing to the knee for mayor's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.