कुचीजवळ अपघातात दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST2021-09-21T04:28:49+5:302021-09-21T04:28:49+5:30
कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मोटारीने दुचाकीला ठोकरल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. भीमसेन दत्तात्रेय ...

कुचीजवळ अपघातात दोघे ठार
कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मोटारीने दुचाकीला ठोकरल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. भीमसेन दत्तात्रेय सासणे, दत्तात्रय अनिरुद्ध राऊत (दोघे रा. बलवडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात रविवारी रात्री आठच्या दरम्यान घडला. अपघातानंतर मोटारीचा चालक पसार झाला.
या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे. रणजीत सुभाष सासणे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
रविवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान भीमसेन सासणे व दत्तात्रय राऊत दुचाकीवरून (एमएच ४५ एपी २९६४) बलवडी येथील घरी निघाले होते. यावेळी सोलापूरहून मिरजेकडे मोटार (एमएच १३ एझेड ३९१८) वेगाने जात होती. या मोटारीने कुचीनजीक एका हॉटेलसमोर चुकीच्या दिशेने येऊन सासणे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये जबर मार लागल्याने सासणे व राऊत जागीच ठार झाले. अपघातानंतर मोटार चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु काही अंतरावर जाऊन टायर फुटून मोटार बंद पडली. यामुळे मोटार तेथेच टाकून तो पळून गेला.
कवठेमहांकाळ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मोटार ताब्यात घेतली. अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नामदेव दांडगे करत आहेत.