खंडणीसाठी दोघांचे अपहरण
By Admin | Updated: September 15, 2015 00:46 IST2015-09-15T00:46:29+5:302015-09-15T00:46:29+5:30
सांगलीतील घटना : बेदम मारहाण; गुंड म्हमद्या नदाफ टोळीविरुद्ध गुन्हा

खंडणीसाठी दोघांचे अपहरण
सांगली : दोन लाखाच्या खंडणीसाठी अंकुश फोंडे (वय २४) व त्याचा मित्र गोरखनाथ माने (२४, रा. पाटणे प्लॉट, अभयनगर, सांगली) या दोघांचे गुंड म्हमद्या नदाफ टोळीने रविवारी रात्री अपहरण करून बेदम मारहाण केली. खंडणीची रक्कम न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या खिशातील सहा हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी म्हमद्यासह सहाजणांविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात अपहरण, मारहाण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये म्हमद्या नदाफ, सागर शेंडगे, अक्षय पाटील, अक्षय गायकवाड, मंगेश व आरीफ (पूर्ण नाव निष्पन्न नाही, सर्व रा. संजयनगर) यांचा समावेश आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना केले आहे. म्हमद्याने सहा महिन्यांपूर्वी गोरखनाथ माने याच्याकडे दोन लाखाच्या खंडणीची मागणी केली होती.
मानेने खंडणी देण्यास नकार दिला होता. तेव्हापासून म्हमद्या व त्याचे साथीदार त्यास खंडणीसाठी धमकावत होते. अंकुश फोंडे हा गोरखनाथचा मित्र आहे. म्हमद्याने रविवारी रात्री अंकुशच्या मोबाईलवर संपर्क साधून ‘तुझ्या मित्राकडून आम्हाला दोन लाखांची खंडणी घेऊन दे नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यास बोलावून घेतले. तो आल्यानंतर म्हमद्या व त्याच्या साथीदारांनी त्यास दुचाकीवरून तात्यासाहेब मळ्यात नेले. तिथे कोयत्याचा धाक दाखवून बेदम मारहाण केली.
म्हमद्याने अंकुशला गोरखशी संपर्क साधून त्यास संजयनगर येथील हनुमान मंदिराजवळ येण्यास सांगितले. तोही आला. त्यानंतर म्हमद्याने पुन्हा या दोघांना कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. त्यांच्या खिशातील सहा हजार दोनशे रुपये काढून घेतले. रात्रभर या दोघांना ओलीस ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न केला; पण या दोघांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून थेट पोलीस ठाणे गाठले.
म्हमद्या पुन्हा चर्चेत
खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, अपहरण, हत्यार बाळगणे, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेला म्हमद्या नदाफ पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो जामिनावर बाहेर आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध कुपवाड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. संजयनगर, अभयनगर, शिंदे मळा याठिकाणी त्याची दहशत आहे.