सभापती निवडीत दोन्ही काँग्रेस एकत्र!

By Admin | Updated: June 7, 2014 00:20 IST2014-06-07T00:18:44+5:302014-06-07T00:20:38+5:30

‘स्वाभिमानी’ला धक्का : पाच पदे काँग्रेसकडे, तर एक राष्ट्रवादीकडे

Both Congress together in the election of the Speaker! | सभापती निवडीत दोन्ही काँग्रेस एकत्र!

सभापती निवडीत दोन्ही काँग्रेस एकत्र!

सांगली : महापालिकेच्या विविध समिती सभापती निवडीत स्वाभिमानी विकास आघाडीला दूर सारून राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये समझोता झाला. धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता असतानाच काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर समझोता करून प्रभाग क्रमांक तीनचे सभापतीपद राष्ट्रवादीला देऊन इतर पाच ठिकाणी स्वत:चे सदस्य निवडून आणले. प्रभाग समिती क्रमांक दोन येथेच केवळ निवडणूक झाली. इतर सर्व सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या.
प्रभाग समिती १ मध्ये पुरुषोत्तम ऊर्फ बाळासाहेब मुरलीधर काकडे यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग २ च्या सभापतीपदी काँग्रेसच्या शकुंतला दत्तात्रय भोसले यांनी स्वाभिमानी विकास आघाडीच्या अश्विनी हेमंत खंडागळे यांचा तेरा मतांनी पराभव केला. भोसले यांना १७, तर खंडागळे यांना ४ मते पडली. प्रभाग समिती तीन येथे राष्ट्रवादीच्या सौ. स्नेहा संजय औंधकर व प्रभाग समिती चार येथे सभापतीपदी काँग्रेसच्या मालन चंद्रकांत हुलवान यांची बिनविरोध निवड झाली.
गुंठेवारी समिती सभापतीपदी काँग्रेसच्या शालन मारुती चव्हाण व मागासवर्गीय दलित वस्ती सुधार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्याच शेवंता गोपाळ वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी काम पाहिले. निवडीनंतर महापालिकेसमोर सभापती निवडी झालेल्या सभापतींच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी व गुलालांची उधळण करण्यात आली. दुचाकीवरून शहरात रॅलीही काढण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Both Congress together in the election of the Speaker!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.