दोघा भाऊंची गट्टी अन् बदलाचे वारे
By Admin | Updated: December 15, 2015 00:34 IST2015-12-14T23:52:31+5:302015-12-15T00:34:44+5:30
शिराळ्यातील चित्र : शिवाजीराव नाईकांविरोधात राजकीय व्यूहरचना

दोघा भाऊंची गट्टी अन् बदलाचे वारे
अशोक पाटील-- इस्लामपूर -शिराळा तालुक्यातील स्थानिक पातळीवरील सर्वच निवडणुकांत तिन्ही मातब्बर गट एकमेकांविरोधात नेहमीच उभे ठाकले जातात. विधानसभा निवडणुकीतही प्रत्येकाने ताकद अजमावली. त्यात शिवाजीराव नाईक सरस ठरले. त्यामुळे आता आगामी सर्व निवडणुकांत राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुखव या दोघा भाऊंनी हातात हात घालून गट्टी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे वाळवा-शिराळ्यात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहे.विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी तोडून स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. याचा त्यांना मोठा फटकाही बसला. विकास आघाडीचे नेते शिवाजीराव नाईक यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून मोदी लाटेवर निवडणूक जिंकली. आता ते मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. त्यांना मंत्रीपद मिळाल्यास त्यांची ताकद वाढणार आहे. याचा परिणाम दोघा भाऊंच्या राजकीय अस्तित्वावर झाला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या दोन भाऊंनी स्वतंत्रपणे मोर्चा काढून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आ. नाईक यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश व्हावा, अशी मागणी केली होती.या घटनेला जवळपास महिन्याभराचा कालावधी लोटला असला तरी, शासनाकडून अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. ‘एक से भले दो’ असे म्हणत सत्यजित देशमुख व मानसिंगराव नाईक यांनी हातात हात घालून १६ डिसेंबरला पुन्हा एकदा शासनाला जाग आणण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातून शेतकरी येण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. या दोघांच्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकविणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे या मोर्चामागे आमदार नाईक यांना धक्का देण्याची खेळी असल्याची चर्चा आहे.