दोघे वाहून गेले
By Admin | Updated: July 25, 2014 00:03 IST2014-07-24T23:54:20+5:302014-07-25T00:03:54+5:30
दोन युवक जांभुळधाबा येथील रहिवासी : एकाचे प्राण वाचले, एक बेपत्ता

दोघे वाहून गेले
शेगाव : पूर्णा नदीत मिळणार्या नया अंदुरा ता.बाळापूर येथील पानखासच्या नाल्याला पूर असताना अतिधाडस करुन मोटारसायकलने नाला ओलांडण्याचा प्रयत्न करणे दोन युवकांना महागात पडले. हे दोघे जण मोटारसायकलसह पाण्यात वाहून गेल्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडली. यामधील एका युवकाने वाहताना बाभळीच्या झाडाला पकडल्याने तो वाचला. मागील दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाने कहर केल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे. यामुळे शेगाव -आकोट मार्ग बंद असून, या मार्गावरील सर्व वाहतूक निंबा फाटा येथे ठप्प झाली आहे. तर पूर्णा नदीत मिसळणार्या पानखासच्या नाल्यालाही पूर आहे. दरम्यान, नया अंदुरा जवळून वाहणार्या पानखासच्या नाल्यावर १0 ते १२ फूट पाणी वाहत असून, या पुरातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार्या मलकापूर तालुक्यातील जांभुळधाबा जि.बुलडाणा येथील गोपाल शिवराम पांडे (वय २८) व त्याचा मित्र उमेश ईश्वर मुरेकर (वय २२) हे आपल्या मोटारसायकल क्र .एम.एच.२८ -९९९५ सह पुरात वाहून गेले. यामध्ये गोपाल पांडे याने बाभळीच्या झाडाला पकडल्याने दैव बलवत्तर म्हणून तो वाचला; मात्र उमेश मुरेकर हा अद्यापही बेपत्ता आहे. दोन्ही युवक हे मुंडगाव ता.अकोट येथे जाण्यासाठी निघाले होते. घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे तहसीलदार समाधान सोळंके, ठाणेदार इंगळे हे घटनास्थळावर दाखल झाले. बेपत्ता युवकाचा शोध घेण्यात येत आहे; मात्र वृत्त लिहिपर्यंत शोध लागला नव्हता.