बीओटी, कर्जास स्वाभिमानीचा विरोध

By Admin | Updated: May 27, 2015 01:02 IST2015-05-26T22:57:30+5:302015-05-27T01:02:11+5:30

गौतम पवार : कायद्याचे उल्लंघन केल्यास लढा उभारू

BOT, Opposition of debt self-respect | बीओटी, कर्जास स्वाभिमानीचा विरोध

बीओटी, कर्जास स्वाभिमानीचा विरोध

सांगली : महापालिकेने आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी काही जागा बीओटीवर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शासनाच्या योजनांसाठी २०० कोटीचे कर्ज घेतले जाणार आहे. या दोन्ही विषयांना स्वाभिमानी आघाडीचा विरोध असल्याचे नगरसेवक गौतम पवार यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत सांगितले. बीओटीत कायद्यानुसार प्रक्रिया राबविल्यास पाठिंब्याचा विचार होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले की, बीओटीचा पूर्वानुभव फारच वाईट आहे. त्यामुळे नव्याने बीओटीचे प्रकल्प राबविण्यास आमचा विरोध आहे. त्याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे. महापालिकेने शहरातील मालमत्तांची सूची तयार करावी, त्यांचे वर्गीकरण करावे, बाजारमूल्य, भाडेमूल्य ठरवून फेरमूल्यांकन व्हावे, अशी मागणी केली आहे. व्यावसायिक भूखंडाची निश्चिती करून त्याची यादी जाहीर झाली पाहिजे. काही जागा क्रीडांगण, नाट्यगृहे यांना राखीव असल्या पाहिजेत.
बीओटी करताना प्रशासन, सत्ताधाऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांचा डाव हाणून पाडू. आतापर्यंत कायद्याचा गैरअर्थ लावून बीओटीत भूखंडांची लूट झाली आहे.
पाणी, ड्रेनेजसह विविध योजनांसाठी २०० कोटीचे कर्ज उभारण्याबाबत आयुक्तांनी नुकतीच पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पण कर्ज उभारताना कारण, तारण व परतफेडीची माहिती सदस्यांना दिली पाहिजे. त्याशिवाय प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलू नये. आयुक्तांनी मागील महासभेच्या ठरावाचा आधार घेत कर्ज उभारणीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याला आमचा विरोध आहे. बीओटी व कर्ज या दोन्ही विषयावर जनतेतून लढा उभारण्याचा इशाराही पवार यांनी दिला. (प्रतिनिधी)

...तरच पाठिंबा देऊ
महापालिकेने भूखंडाचे मूल्यांकन करून त्यावर महासभेत पारदर्शी चर्चा घडविली पाहिजे. आतापर्यंत गुपचूप भूखंड लुटीचा उद्योग झाला आहे. त्यामुळे आता महापालिकेने आपला हक्क अबाधित राखून नियमानुसार चर्चा घडवून बीओटी होणार असेल, तर आमचा पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: BOT, Opposition of debt self-respect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.