लगोडबंद विहीर आष्टेकरांसाठी वरदान
By Admin | Updated: April 30, 2016 00:51 IST2016-04-29T23:24:38+5:302016-04-30T00:51:08+5:30
नूतनीकरण सुरू : शिवकालीन इतिहासाचा ठेवा; १९७२ च्या दुष्काळाची साक्षीदार
लगोडबंद विहीर आष्टेकरांसाठी वरदान
सुरेंद्र शिराळकर --- आष्टा -येथील पुरातन अशा लगोडबंद विहिरीच्या नूतनीकरणाचे काम आष्टा नगरपालिकेने सुरू केले आहे. अल्पसंख्याक आयोगाच्या अनुदानातून दहा लाख रुपये खर्चून ऐतिहासिक अशा या विहिरीचे पुन्हा बांधकाम सुरू झाल्याने आष्ट्याचा शिवकालीन वारसा जपला जात आहे. या विहिरीचे पाणी सोमलिंग तलावात सोडून तेथे बगीचा फुलविण्यात येणार असल्याने, लगोडबंद विहीर पुन्हा आष्टेकरांच्या मदतीला धावून आली आहे.
१९७२ च्या दुष्काळातही या विहिरीतील पाण्याने आष्टेकरांची तहान भगविली. मात्र त्यानंतर आष्टा पालिकेने कृष्णा नदीवरून शहराला पिण्यासाठी पाणी आणले. २००७ मध्ये नवीन पाणी पुरवठा योजना झाल्याने प्रत्येकाच्या घरात कृष्णेचे पाणी मिळू लागल्याने, या विहिरीचे पाणी वापरणे बंद झाले. मात्र आष्टा येथील चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवावेळी तसेच काशिलिंग बिरोबाच्या पूजेसाठीही या विहिरीचेच पाणी परंपरागत पद्धतीने वापरले जाते. अतिशय आखीव-रेखील दगडात बांधलेल्या या विहिरीचे बांधकाम ढासळू लागल्याने आष्टा पालिकेने, शेकडो वर्षापूर्वीचा हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्यादृष्टीने अल्पसंख्याक अनुदान आयोगाच्या अनुदानातून या विहिरीचे बांधकाम सुरू केले आहे. ही विहीर आष्टेकरांसाठी वरदान ठरली आहे.
माजी आ. विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वीच्या बांधकामानुसार सामग्रीचा वापर करून काम करण्यात येत आहे. कोल्हापूर, बेळगाव येथील कारागीर हा ठेवा जतन करण्याचे काम करीत आहेत. लगोडबंद विहिरीत कायमस्वरुपी जिवंत पाण्याचे झरे असल्याने येथील पाणी कमी होत नाही, काम पूर्ण झाल्यानंतर या विहिरीवर कचरा पडू नये, यासाठी जाळी बसविण्यात येणार आहे. या विहिरीतील पाणी विद्युत पंप बसवून सोमलिंग तलावात नेण्यात येणार आहे. आष्ट्याच्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या या विहिरीचे पाणी पुन्हा सुरू झाल्याने इतिहासाला उजाळा मिळणार आहे.
बारमाही विहीर : धार्मिक कार्याला पाणी
आष्टा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हजरत पीर लगोडबंद दर्गा आहे. या ठिकाणीच लगोडबंद विहीर आहे. या विहिरीचे बांधकाम तत्कालीन मुस्लिम शासक आदिलशहाने करून दिल्याचे सांगितले जाते. प्राचीनकाळी आष्ट्यातील नागरिक याच लगोडबंद विहिरीचे पाणी वापरत होते. त्याकाळी गावातील सर्वच धार्मिक कार्याला व वर्षानुवर्षे पिण्यासाठी या विहिरीतून पाणी वापरत होते.विहीर आष्टा शहराच्या मध्यवर्ती व सखल भागात असल्याने इतर ठिकाणच्या विहिरींचे पाणी कमी झाले तरी या विहिरीचे पाणी कधीच आटले नाही.
ऐतिहासिक विहिरीचे पाणी वापराविना वाया
आष्टेकरांची तहान भागविणाऱ्या या विहिरीचे पाणी गेल्या काही वर्षापासून नागरिक वापरत नसल्याने या विहिरीत गवत, गाळ साठला आहे. यामुळे पाण्यालाही दुर्गंधी येत आहे. यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या विहिरीला उतरती कळा लागली आहे. विहिरीचा कठडा, बांधकाम पडू लागले आहे.
आष्टा येथील शिवकालीन लगोडबंद विहीर.