पावसाविना जिल्ह्यातला बेंदूर कोरडाच!

By Admin | Updated: July 30, 2015 00:24 IST2015-07-29T23:30:05+5:302015-07-30T00:24:10+5:30

शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण : सण आणि निसर्गाचे गणित बिघडल्याचे चित्र...

Bondur dryade in rainy district! | पावसाविना जिल्ह्यातला बेंदूर कोरडाच!

पावसाविना जिल्ह्यातला बेंदूर कोरडाच!

सहदेव खोत -पुनवत -बेंदूर सण म्हणजे सर्वत्र पाऊस, हे परंपरागत समीकरण. या सणावेळी सर्वत्र नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत असतात. ग्रामीण भागात तर या सणाच्यानिमित्ताने आनंदाला उधाण आलेले असते. परंतु यावर्षी जिकडे-तिकडे कडक ऊन अन् कोरडी ठणठणीत शेती, यामुळे शेतकऱ्यांच्या या सणाच्या आनंदावर यावर्षी जणू विरजणंच पडले आहे.
बैलांना नदीवरून धुऊन आणणे, त्यांना सजवणे, वर्षाचे अन्न देणाऱ्या काळ्या आईला (शेतीला) चिखलवाटा तुडवीत पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करणे, शेतात पिंपळाच्या पानांचे तोरण वाहणे, असे बरेच काही या सणाला असते. पण यंदाच्या बेंदरात पाऊस नसल्याने, तसे आनंददायी चित्र पाहायला मिळालेच नाही.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात बेंदूर सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भर पावसाळ्यात बेंदराचा सण येतो. दरवर्षी बेंदराला धुवाँधार पाऊस असतो. नद्यांना हमखास पूर येतो. ग्रामीण भागात या पुराला बेंदरी पूर म्हणतात. अर्थात पुराने हानी होत असली तरी, या बेंदरी पुरामुळे अनेकांचे काही फायदेही होत असतात. शेती पिकविण्यास शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या सर्ज्या-राज्याच्या जोडीला अंघोळ घालून छान सजवलं जातं. त्यांना अंबील, घुगऱ्या, हुंडे, नैवेद्य खायला घातला जातो. शेतकरी या दिवशी आपल्या बैलांप्रती व शेताप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.
मात्र यावर्षी बेंदूर सण व पाऊस यांचे गणितच बिघडल्याने शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना या सणाचा आनंदच घेता आला नाही. ना शेतात पाणी ना चिखल, ना नदी-नाल्यांना पूर. या परिस्थितीमुळे बेंदूर सणातील उत्साहच यंदा निघून गेला. एकंदरीत बदलत्या काळात बेंदूर आणि पाऊस यांचे समीकरण बिघडल्याने या सणातला नेहमीचा आनंदच हरविला आहे.

Web Title: Bondur dryade in rainy district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.